
देवळा: मौजे सावकी ता. देवळा येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी येथील रहिवासी आयुब हैदर पटेल , तौसिफ फरीद पटेल यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाचा आशय असा की , मौजे सावकी (लो.) ता. देवळा शिवारातून गिरणा नदी पत्रातील वाळू उपसा करण्यासाठी शासनाने लिलाव करण्याचा निर्णय घेतला . त्यावेळेस गावाने त्यास विरोध दर्शवला होता, त्यानंतर आपल्या उपस्थितीत गावात सभा घेऊन वाळू उपसा होऊ नये व लिलाव करू नये असे ठरवून आपण स्वतः गावातील सरपंच, सदस्य यांना व गावातील जबाबदार नागरीकांना सुचना दिली होती की, सदर नदीपात्रातून वाळू उपसा होऊ नये यासाठी गाव पातळीवर तुम्ही स्वतः लक्ष घाला व वाळू उपसा पूर्णपणे बंद ठेवा असे सागितल्यानंतर देखिल गावातील ग्रामपंचायतीचे काही सदस्य व इतर चार ते पाच इसम हे संगनमताने गेल्या एक वर्षापासून रोज २० ब्रास वाळू खाजगी मालकाच्या ट्रॅक्टरने वाहतूक करून साठा करतात व तेथून ट्रकद्वारे बाहेरील कॉन्ट्रॅक्टर यांना विक्री करतात.
याबाबत आम्ही हरकत दिली असता त्यांनी आम्हाला सांगितले की, सदर वाळू फक्त गावासाठी व गावातील घरकूलांचे बांधकाम करण्यासाठीच वाहतूक करीत आहोत, त्यामुळे सदर वाळूस हरकत देता येणार नाही असे सांगितले, परंतु आम्ही प्रत्यक्षात चौकशी केली असता सदर वाळूची अवैद्य रित्या चोरी होत असल्याचे आढळून आले.
दरम्यान हा अवैधरित्या होणारा वाळू उपसा गावातील तलाठी यांना दिसत असून देखिल ते रोखत नाही, यामुळे आम्हाला त्यांच्या कारभाराबाबत शंका उपस्थित झाल्याने आपण याची तात्काळ दखल घेऊन गावातील वाळू उपसा त्वरीत बंद करण्यात यावा व संबंधीतांवर कार्यवाही करण्यात यावी तसेच यापूर्वी झालेला वाळू उपसाचा दंड वसूल करण्यात येऊन सदर अवैद्य वाळू वाहतूक करण्याऱ्या वाहनावर गुन्हा दाखल करण्यात येऊन यात सहभागी असलेल्या ग्रा.पं. सदस्यांचे पद रद्द करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान या तक्रारी वरून शुक्रवारी दि १५ रोजी .सावकी ता . देवळा येथे सकाळी १० वाजता तलाठी कल्याणी कोळी यांनी विठेवाडी पुलाजवळ गिरणा नदीच्या काठी सावकी शिवारात वाळू ने भरलेला विना नंबर ट्रॅक्टर पकडले असुन कार्यवाही झालेली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम