दिल्ली : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील पर्वताच्या शिखरावर हिमस्खलन झाल्याची मोठी दुर्घटना झाली आहे. या हिमस्खलनमुळे द्रौपदी का डांडा-२ शिखराकडे जाणारे जवळपास २८ प्रशिक्षित गिर्यारोहक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही माहिती दिली आहे.
उत्तरकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या १७० गिर्यारोहकांचा एक गट या शिखरावर प्रशिक्षण घेत होते. यातील सात प्रशिक्षकांसह २८ गुर्यारोहक अडकले असून आतापर्यंत ७ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. तर उर्वरित २१ जण अद्याप अडकले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच हिमस्खलनात अडकलेल्या प्रशिक्षणार्थींना वाचवण्यासाठी डेहराडूनमधील सहस्त्रधारा हेलिपॅडवरून एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. तसेच भारतीय वायुदलाने बचावकार्यासाठी दोन चिता हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत.
द्रौपदी का डांडा-2 पर्वत चोटी में हिमस्खलन होने के कारण नेहरू पर्वतारोहण संस्थान, उत्तरकाशी के 28 प्रशिक्षार्थियों के फंसे होने की सूचना प्राप्त हुई है।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) October 4, 2022
यावेळी मुख्यमंत्री धामी म्हणाले की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलल्यानंतर या बचावकार्याला गती देण्यासाठी लष्कराची मदत घेण्याची विनंती केली असून त्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच घटनेतील सर्वांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम राबवली जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिमस्खलनाची माहिती मिळताच वायुदलाद्वारे 2 हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. तसेच या घटनेतून बचावलेल्या प्रशिक्षणार्थींना सध्या ITBPच्या हेलिपॅडवर आणले जात असून या बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासन, NDRF, SDRF, लष्कर व ITBP च्या जवानांमार्फत बचाव आणि मदतकार्य जोमाने व जलदगतीने सुरु आहे.
दरम्यान, वायुदलाच्या बचाव पथकाने निवेदनात म्हटले आहे की, उत्तरकाशी येथील बचाव आणि मदतकार्यासाठी वायुदलाने २ चिता हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. तसेच गरज भासल्यास, इतर सर्व हेलिकॉप्टरचा ताफा वायुदलाकडून स्टँडबायवर ठेवण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम