द पॉईंट नाऊ: नाशिक; पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या महाविद्यालय स्तरावर घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल अद्यापही अनेक महाविद्यालयांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जमा केलेले नाहीत. यामुळे जवळपास १ लाख १० हजार विद्यार्थ्यांचे निकाल रखडले आहेत. महाविद्यालयांच्या हलगर्जीपणामुळे निकालात होणारी ही दिरंगाई विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक नुकसानीला कारणीभूत ठरणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा ऑफलाइन परीक्षा घेतली होती. पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ स्तरावर, तर पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याचे नियोजन विद्यापीठामार्फत केले होते. त्यानुसार पेपर झाल्यानंतर ते महाविद्यालयातच तपासून विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाकडे जमा करण्याची सूचना दिली होती. परीक्षा सुरू झाल्यापासून हे ऑनलाइन मार्क जमा करण्याची सुविधा दिली होती. याबाबत ट्रेनिंगही घेण्यात आले होते. तरीही महाविद्यालयांनी हे गुण जमा केलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठ परीक्षा विभागाने आढावा घेतला असता, अद्यापही १३ अभ्यासक्रमांचे गुण अनेक महाविद्यालयांनी जमाच केलेले नसल्याचे समोर आले आहे. २६ सप्टेंबरपर्यंत हे निकाल जमा करण्याची मुदत महाविद्यालयांना दिली असून, त्यानंतर ही सुविधा बंद होणार असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याला विद्यापीठ नव्हे, तर महाविद्यालय जबाबदार असेल असा थेट इशाराही परीक्षा विभागाने दिला आहे. याबाबत नाशिक जिल्ह्याची माहिती घेतली असता, नाशिक जिल्ह्यातील विविध पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे अपवाद वगळता सर्व निकाल विद्यापीठाकडे जमा केल्याची माहिती केटीएचएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी दिली.
तिसऱ्या वर्षाचे अडकले निकाल
चॉईस बेसड् क्रेडिट सिस्टीममुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या निकालावर पहिल्या दोन वर्षांच्या क्रेडिटचा समावेशही करावा लागतो. पहिल्या दोन वर्षांचे बॅकलॉगचे विषयही असतात. त्यामुळे पहिल्या दोन वर्षांच्या निकालाशिवाय तिसऱ्या वर्षाचा निकालही जाहीर करता येत नाही.
अभ्यासक्रम – प्रलंबित निकाल टक्केवारी
बीसीए (२०१३) -४.१७
बीएस्सी सीएस (२०१३) – ३३.१२
बीएस्सी ॲनिमेशन – २.७०
बीसीए सायन्स – १२.५०
बीबीए (२०१३) – ८.२२
बीबीए (सीए) – ११.५८
बीबीए (इंटरनॅशल बिझनेस) – १४.२९
बीएचएमसीटी (२०१६) – १३.९५
बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी) – ८८.५७
बीकॉम (२०१३) – ६३.९४
बीकॉम (२०१९) – २९.९७
बीए (२०१३) – ७१.६२
बीए (२०१९) – ५७.८८
निकाल वेळेत जाबाबदारी परीक्षा विभागाची असली, तरी महाविद्यालयांच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही. १ लाख १० हजार विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहेत. आर्टची परीक्षा अद्याप सुरू असून, हा अभ्यासक्रम वगळता ३० सप्टेंबरपर्यंत सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे. असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक, डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम