राजभाऊ तुम्ही अजून दोन पत्र लिहा…! सुषमा अंधारेंची राज ठाकरेंकडे मागणी

0
30

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावत त्यांच्याकडे आणखीन दोन पत्रे लिहिण्याची मागणी केली आहे.

अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक भावनिक पत्र लिहिले होते. त्यानंतर अनेक नेत्यांनीदेखील बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन केले होते. त्यावर कालपासून भाजपात सुरु असलेल्या चर्चेनंतर आज भाजपने निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी या निर्णयाचे कौतुक करत देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांचे आभारदेखील मानले होते. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांचे पत्र हे भाजपचे स्क्रिप्ट असल्याचा टोला लगावला आहे. तसेच, अंधारे यांनी राज ठाकरे यांना भाजपला आणखीन काही पत्र लिहिण्याची मागणी केली आहे.

सुषमा अंधारेंचा व्हिडियो आणि त्यांची मागणी

सुषमा अंधारे यांनी एक व्हिडियो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. ज्यात त्यांनी भाजपने माघार घेतल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्या म्हणाल्या, की भाजपचा संवेदनशील राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र म्हणजे भाजपची स्क्रीप्ट आहे. असे म्हणत राज ठाकरेंच्या पत्राचा परिणाम खरच जर भाजपवर होत असेल. किंवा भाजप तुमचे ऐकत असेल, तर राज ठाकरेंनी आणखी एक पत्र लिहावे. तसा मजकूरही मी तयार करून ठेवलाय, असे म्हणत राज यांना टोला लगावला आहे.

पुढे आपल्या व्हिडियोमध्ये तो मजकूर सांगताना राज यांनी भाजपला दोन पत्रे लिहिण्याची मागणी केली आहे. त्या म्हणतात, राज यांनी भाजपला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असे राज्यपाल तथाकथित महाशक्तीने परत बोलावले पाहिजेत. व वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी पत्र हे दोन पत्र लिहा, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. दरम्यान, अंधारे यांच्या या वक्तव्यावर राज ठाकरे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

तसेच त्यांनी यावेळी भाजपवरही जोरदार निशाणा साधत म्हणाल्या, राजकीय नेत्यांच्या आवाहनानंतर माघार घेणे हा मुलामा आहे. भाजपला पराभव दिसत होता, सगळ्या एजन्सीनी भाजपचा पराभव होईल, असे सांगितले गेल्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. जर भाजपला संवेदनशील राजकारण आणि संस्कृती जपायची असती, तर तेव्हाच त्यांनी कोल्हापूर आणि पंढरपूर पोटनिवडणुकीतून माघार घेतली असती, अशीही टीका सुषमा अंधारे यांनी यावेळी केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here