राज्यातील मॉलमध्ये लवकरच वाइनविक्री सुरू होण्याची शक्यता

0
30

द पॉईंट नाऊ: राज्यातील मॉलमध्ये लवकरच वाइनची विक्री सुरू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत राज्य सरकार कडून मागविण्यात आलेल्या सूचना व हरकती प्राप्त झाल्या असून, त्याबाबत अजून अभ्यास सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी गुरुवारी दिली. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा निर्णय मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे.

राज्यभरातील मॉलमध्ये वाइन विक्री करण्या संदर्भात निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. त्यावेळी मात्र भाजपने या निर्णयाला जोरदार विरोध केला होता. तेव्हा तत्कालीन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायला निघाले असल्याची टीका केली होती. आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांनीही विरोध केला होता. मात्र, राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा, तसेच वाइन उद्योगाला चालना मिळावी यासाठीच आपण हा निर्णय घेतला असल्याचे समर्थन तत्कालीन मविआ सरकारमधील मंत्र्यांनी केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, मॉलमधून वाइनविक्रीसंदर्भात लोकांच्या हरकती व सूचना राज्य सरकारला प्राप्त झाल्या आहेत. आता त्याची वर्गवारी करण्यात येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रीमंडळासमोर जाईन.

शेतकरीहिताचा विचार करून राज्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होते. ही द्राक्षे मात्र शेतकऱ्यांकडून थेट वायनरीकडे जात नाहीत. शेतकऱ्यांकडून द्राक्षे कमी किमतीत खरेदी केली करून मध्यस्थ ती वायनरीला चार पट किमतीने विकतो. शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःचे वाइन यार्ड बनवावे व उत्पादन करावे,’ अशी आपली भूमिका आहे, असेही देसाई म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here