जळगाव – इंदुरहून जळगावमधील अमळनेरकडे येणाऱ्या एसटी बस आज मध्यप्रदेशातील धर येथील नर्मदा नदीत कोसळली. ह्यात चालक-वाहकासह १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर १२ ते १५ जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य जोमाने सुरू आहे. आता आलेल्या माहितीनुसार सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून यात मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज मध्यप्रदेशच्या इंदूरहून अमळनेरकडे निघणारी एसटी (MH 40 AN 9848) ही बस मध्यप्रदेशातील धारजवळ पोहोचताच तांत्रिक बिघाड झाल्याने तिचे नियंत्रण सुटले आणि खलघाट मधील नर्मदा नदी पुलावरून बस थेट नदीत कोसळली. ह्यात एकूण ५० ते ५५ प्रवासी होते. त्यापैकी १३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३० ते ३५ जण हे बेपत्ता झाले. माहिती मिळताच मदत यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्याला सुरुवात झाली. अपघात झालेली एसटी बस क्रेनच्या साहाय्याने काढण्यात आली.
या घटनेत बसचालक चंद्रकांत एकनाथ पाटील(४५), वाहक प्रकाश श्रावण चौधरी(४०) व इतर ११ प्रवासी मृत झाले आहे. जवळपास सर्वांची ओळख पटली असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू असल्याची माहिती एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. मृतांमध्ये अनेक प्रवासी हे महाराष्ट्रातील असून २ मृत प्रवासी राजस्थानमधले आहेत.
मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून मदत जाहीर
दरम्यान, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख, तर एसटी महामंडळाकडून प्रत्येकी १० लाख रुपये तातडीने देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच दोन्ही राज्यांकडून मदतकार्य तातडीने राबवण्याचे निर्देश दिले आहे, त्यानुसार मदतकार्य सुरू आहे. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री त्याकडे लक्ष देत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत त्यांना लागणारी आवश्यक ती मदत करणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रपती, पंतप्रधान व अनेक नेत्यांकडून शोक व्यक्त
दरम्यान, ह्या दुर्घटनेची माहिती मिळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व आदि नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हेल्पलाईन नंबर कार्यान्वित
दरम्यान, या अपघातासंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने नियंत्रण कक्ष स्थापन केले असून मदतीसाठी हेल्पलाईन नंबरदेखील सुरू करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम