मुंबई : कालच मुंबईत शिंदे गट व ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. लाखो शिवसैनिकांनी वेगवेगळ्या मैदानांवर हजेरी लावली होती. मात्र, मेळाव्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चक्क मुंबई विद्यापीठाच्या जागेवर मद्यप्राशन केल्याची धक्कादायक बाब आढळून आली आहे.
बीकेसी मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा काल बुधवारी पार पडला. या मेळाव्यासाठी राज्यभरातून आलेल्या शिंदे समर्थकांची वाहने ही मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत पार्क केली गेली होती. मात्र, याच जागेत काही कार्यकर्त्यांकडून मद्यप्राशन करून झाल्यानंतर काही मद्याच्या बाटल्या फेकण्यात आल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. तसेच संपूर्ण विद्यापीठ परिसरात पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. शिवाय पार्किंग गेट ही तुटले आहे. त्यामुळे शिक्षणाचे पवित्र मंदिर असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आवारात अशा प्रकारे कचरा आणि दारुच्या बाटल्या फेकल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यानी आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या युवासेनेने केली आहे.
ज्यावेळी मेळाव्यासाठी विद्यापीठाची जागा शिंदे समर्थकांच्या गाड्यांच्या पार्किंगकरता देण्यात आली, त्यावेळी ठाकरे गटाच्या युवासेनेसोबत अनेक विद्यार्थी संघटनांनी ह्यास विरोध दर्शवला होता. मात्र विरोधानंतरही मनपा प्रशासनाच्या विनंतीनंतर विद्यापीठाने ही जागा वापरण्यास दिली होती. पण ह्याच जागेवर आता कार्यकर्त्यांनी मद्यपान करून कचरा केल्याचे आढळताच आता ह्यावर काय कारवाई होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिंदे गटाने मुख्य शहरासह राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना दसरा मेळाव्यात आणण्यासाठी एसटी बसेससह अनेक खासगी वाहनांची व्यवस्था केली होती. तसेच मेळाव्याच्या निमित्ताने आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी महापालिकेने ठिकठिकाणी विशेष व्यवस्था केली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम