विष्णू थोरे
चांदवड प्रतिनिधी : इच्छाशक्ती असेल आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी असेल तर अशक्य गोष्टी शक्य करता येते. असं म्हणतात हेच खरे करून दाखवले आहे चांदवड येथील नॅक मानांकित ‘अ’ दर्जाच्या श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागात शिक्षण घेणाऱ्या जयंत पवार या तरुणाने.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातील जयंत पवार या विद्यार्थ्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या जागतिक दर्जाच्या नामांकित कंपनीमध्ये वार्षिक सात लाख रुपयाचे पॅकेज मिळवून आपले, कुटुंबाचे व महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.
सटाणा तालुक्यातील औंदाणे या छोट्याशा खेडेगावातून आलेल्या जयंतला महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागात टि.एफ.डब्ल्यू.एस(TFWS) मध्ये प्रवेश मिळाला. परंतु त्यातच 2020 मध्ये त्याचे पितृछत्र हरवले. पण दुःखातून सावरत आपली तंत्रज्ञानाबद्दल असलेली आवड जोपासत आणि कोरोना काळात मिळालेल्या वेळेचा योग्यरीत्या सदुपयोग करत त्याने घवघवीत यश मिळवले.
सुरुवातीला जयंतला टाटा कंपनीमध्ये व विप्रो कंपनीमध्ये ३.५ लाखाचे पॅकेज मिळाले पण त्याचे मन कमी पगाराच्या नोकरीवर स्वस्त बसू देईना त्यामुळे त्याने पुन्हा जोमाने प्रयत्न करत टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस मध्येच सिस्टम इंजिनियरची पोस्ट घेत ७ लाखाचे पॅकेज मिळविले.
जयंतने महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या साधनांचा व प्राध्यापकांचे लाभलेले उत्कृष्ट मार्गदर्शन याच्या जोरावर यश संपादन केले आहे. जयंतने याचे सर्व श्रेय आपल्या आईला, भावाला, प्राध्यापकांना व महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला दिले आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जयंत पवारच्या या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्री. बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. दिनेशकुमारजी लोढा, सेक्रेटरी श्री. जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितकुमारजी सुराणा, उपाध्यक्ष श्री. अरविंदकुमारजी भन्साळी, तसेच प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक श्री. झुंबरलालजी भंडारी व श्री. सुनीलकुमारजी चोपडा तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. पी. पी. गाळणकर ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे , उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी व यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम