ब्रेकिंग ! निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले; शिवसेना नावही वापरण्यास बंदी

0
20

दिल्ली : आताची सर्वात ब्रेकिंग बातमी दिल्लीहून. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. त्यामुळे ठाकरे व शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हाचा वापर करता येणार नाही. तसेच, आयोगाने शिवसेना हे नावही दोन्ही गटाला वापरण्यास बंदी घातली आहे.

मात्र, हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपातील असून केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. यावेळी दोन्ही गटांना येत्या १० ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, ह्या निर्णयाचा फटका दोन्ही गटांना बसला असून आता येत्या निवडणुकीत शिंदे व ठाकरे गटाला वेगवेगळ्या निवडणूक चिन्हाने निवडणूक लढवावी लागणार आहे.

निवडणूक आयोगात पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाकडून आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात येत आल्याचा आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तत्पूर्वी ठाकरे गटाने आज त्यांच्याकडील महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगात सादर केली होती. शिवाय अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागतायत, असा सवाल ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर केला होता. शिवाय शिंदेंनी अद्याप ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदावर दावा केलेला नाही, त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही असे ठाकरे गटाने सुनावणीवेळी म्हटले होते.

यावेळी ठाकरे गटाने असा दावा केला की, आमच्याकडे दिल्लीत अडीच लाख पदाधिकाऱ्यांची व दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत. फक्त विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा, अशी विनंती ठाकरे गटाने केली आहे. पण जर निवडणूक आयोगाला सदर शपथपत्रे आहे त्या स्थितीत हवी असतील तर तीदेखील आम्ही सादर करू, असा दावा ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर केला होता.

मात्र, आयोगाच्या या निर्णयामुळे आता कोणालाही धनुष्यबाणाचा वापर नाही करता येणार, तसेच शिवसेना हे नावही येत्या निवडणुकीत वापरण्यास आयोगाने बंदी घातलेली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here