सोमनाथ जगताप
देवळा : तालुक्यातील अतिदुर्गम अशा पश्चिम भागातील खर्डे परिसरासाठी पूर्वी सुरु असलेली सटाणा – हनुमंतपाडा मुक्कामी बस पूर्ववत सुरु करण्यात यावी अशी मागणी खर्डेसह ,वाजगांव , वार्शी ,हनुमंतपाडा येथील नागरिकांनी केली आहे. ही बस बंद असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.
पूर्वी याठिकाणी सटाणा आगाराची हनुमंतपाडा मुक्कामी बस सुरु होती. ही बस सेवा गेल्या तीन चार वर्षापासून बंद आहे. या परिसरातील खर्डे गांव हे बाजार पेठेचे गाव असून , याठिकाणी आजूबाजूच्या गावातील विध्यार्थी शाळेत येतात. तसेच अन्य कामासाठी नागरिकांची रेलचेल सुरु असते. त्याच बरोबर परिसरातून देवळा ,सटाणा आदी ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी विध्यार्थी रोज ये जा करतात. परंतु सकाळच्या वेळेत बस नसल्याने त्यांची गैरसोय निर्माण झाली आहे. बहुतांश पालकांकडे परिस्थिती अभावी अन्य साधन नसल्याने पाल्याना वेळेत शाळेत पोहचता येत नाही. परिणामी शैक्षणिक नुकसान होते. तर अन्य वयोवृद्ध नागरिकांना देखील बस सवलतीचा फटका बसत आहे.
या मार्गावर सद्या अवैद्य प्रवाशी वाहतूक देखील बंद आहे. बस सेवा पूर्ववत सुरु झाल्यास एसटी महामंडळाला देखील याचा फायदा होणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांची देखील गैरसोय दूर होण्याकामी मदत होणार आहे. यामुळे सदरची हनुमंतपाडा मुक्कामी बस पूर्ववत सुरु करावी व याची संबंधित आगार व्यवस्थापकांनी दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात देवळा येथे वाजगाव ,खर्डे , कनकापूर , वार्शी , मुलूकवाडी येथील विद्यार्थी शाळेत येतात.
बस अभावी पालकांना रोज आपल्या पाल्यांना पोहचण्याची व शाळा सुटल्यावर घेऊन येण्याची सध्या तसदी घ्यावी लागत असून , यात वेळ व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून , कधी कधी घाई गर्दीत अपघात देखील घडत असल्याने पालक वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यात रस्त्यांची झालेली चाळण आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. याची लोकप्रतिनिधींनी देखील दखल घेऊन हि समस्या तात्काळ मार्गी लावावी अशी मागणी शेवटी करण्यात आली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम