प्रसिद्ध तेलुगु चित्रपट अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन

0
18

मुंबई – प्रसिद्ध तेलुगु चित्रपट अभिनेते “रिबेल स्टार” कृष्णम राजू यांचे आज हैद्राबाद येथे पहाटे दीर्घआजाराने निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. बाहुबली स्टार अभिनेता प्रभास याचे काका होते.

कृष्णम राजू गेल्या अनेक दिवसांपासून विविध आजारांनी त्रस्त होते. काल त्यांची प्रकृती बिघडताच त्यांना हैद्राबाद येथील हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते आणि आज पहाटे ३.२५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णम राजू तेलुगु चित्रपटसृष्टीत ‘रिबेल स्टार’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पश्चात पुतण्या प्रभाससह पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे.

त्यांच्या निधनामुळे तेलुगु चित्रपटसृष्टीसह अभिनेता प्रभासच्या घरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू व तेलुगुसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांसह ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी, अभिनेता ज्यू, एनटीआर, महेश बाबू, पवन कल्याण, विजय देवरकोंडा आदींनी कृष्णम राजू यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. दरम्यान त्यांच्या परिवारातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णम राजू यांच्यावर उद्या दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कृष्णम राजू यांचे पूर्ण नाव उप्पलापती वेंकट कृष्णम राजू असे होते. त्यांचा जन्म २० जानेवारी १९४० रोजी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मोगलथूर येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केले होते. त्यानंतर १९६६ मध्ये ‘चिलाका गोरिंका’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आपल्या पाच दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १८३ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. १९७७, १९७८ साली त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रपती पुरस्कार व १९७७, १९८४ साली आंध्रप्रदेश शासनाचा नंदी पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना ४ फिल्मफेअर अवार्डही मिळाला आहे. ‘राधे श्याम’ चित्रपट हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता, ज्यात ते प्रभाससोबत दिसले होते.

कालांतराने त्यांनी राजकारणात प्रवेश करत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत केंद्रीय मंत्रीदेखील बनले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here