पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला व पुण्यातील वाहतूकीस अडथळा ठरलेला चांदणी चौकातील पूल पाडण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. आज मध्यरात्री अडीच वाजता हा पूल पाडण्यात येणार आहे.
चांदणी चौकातील पूल अवघ्या ५ सेकंदात पाडण्यात येणार असला. तरी पूल पाडल्यानंतर पूलाचा सांगाडा बाहेर काढण्यासाठी या मार्गावरची संपूर्ण वाहतूक तब्बल ९ तास बंद राहणार आहे. म्हणजे, शनिवारी रात्री ११ वाजेपासून ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ह्या मार्गांवरील सर्व वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतील ट्वीन टॉवर बिल्डींग पाडणारी कंपनी ईडीफाईस कंपनी हा पूल पाडणार आहे. कालच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाची हवाई पाहणी केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, हा पूल पाडण्यापूर्वी तेथील २०० मीटरचा परिसर सायंकाळी ६ वाजल्यापासून निर्मनुष्य करण्यास सुरुवात केली आहे. तसेच हा पूल पाडताना त्याचे तुकडे किंवा धूळ आसपासच्या परिसरात उडू नये, त्यादृष्टीने पुलाजवळ तब्बल ६ हजार ५०० मीटरच्या चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटरचे जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच हा पूल पाडण्यासाठी आणि तिथला मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे १६ एक्स्कॅव्हेटर, ४ डोझर, ४ जेसीबी मशिन्स, ३० टिप्पर, २ ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे मोठे टँकर उपलब्ध केले आहेत. आणि सदर पूल पाडण्यापासून ते रस्ता मोकळा करेपर्यंत २१० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान हा पूल पाडला जाणार असल्यामुळे तेथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहेत. मुंबईकडून येणारी जड वाहने ही तळेगाव दाभाडे येथील टोल नाक्याच्या अलीकडे थांबवल्या जातील. तर साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक खेड-शिवापूर परिसरात थांबविली जाणार आहे. हलक्या वाहनांसाठी मुंबईकडून साताऱ्याकडे आणि साताऱ्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहे. तसेच तेथील वाहतूकीच्या नियोजनासाठी पुणे, पिंपरी चिंचवड ही दोन्ही आयुक्तालये आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण ३ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
यावेळी नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम