गेल्या वीस वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी सोमवार दि. २६ जून रोजी नाशिक ते मंत्रालय,मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोर्चात अंबड व सातपूर येथील दोनशेहून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सहकुटुंब सहभागी होणार असून मागण्या मान्य झाल्याशिवाय मंत्रालयातून बाहेर पडणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाकडून नाशिकला वेगवेगळ्या क्लस्टर उभारणीच्या घोषणा केल्या जात आहेत, मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये आजतागायत एसटीपी प्लांटच नसल्याने फक्त क्लस्टर आणून काय होणार आहे ? त्यासाठी अंबड औद्योगिक वसाहती मध्ये एसटीपी प्लांटला तातडीने मंजूरी द्यावी व प्लांट उभा करावा.
१९७३ ला औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन करतेवेळी उरलेल्या शेतकऱ्यांच्या जागेत वहीवाटीसाठी सोडलेल्या ४ ते ५ मीटर रस्त्यांचे क्षेत्र वाढवून १२ मीटर व १५ मीटरचे रस्ते मंजूर करण्यात यावे तसेच महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकान्वये उद्योगधंदे सुरु करण्यासाठीचे प्रोत्साहन धोरण लागू करण्यात यावे.
पीएपी भूखंडापासून वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पीएपी परिपत्रकातील जाचक अटी काढून भूखंड देण्यात यावे, अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची उरलेली जमीन ही रासायनिक सांडपाण्यामुळे नापिक झाल्यानंतर त्याठिकाणी छोटे मोठे उद्योगधंदे चालू केले असताना नाशिक महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामबाबतीतील नोटीसा मागे घेण्यात याव्यात.
अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून छोटेमोठे उद्योग सुरू करून जमीनीवर बांधलेल्या तात्पुरत्या शेडधारकांना अवाजवी दराने नाशिक महापालिकेकडून आकारण्यात येणारी वाढीव घरपट्टी सवलतीच्या दरात करुन द्यावी.
वाढीव घरपट्टी आकारण्यात येऊ नये तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेल्या दंडात्मक नोटीसा मागे घेण्यात याव्यात, याबरोबरच अनेक वर्षापासून मागणी असलेले अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनला त्वरित मंजूरी द्यावी.
आजपर्यंत नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी विविध प्रकल्पांसाठी संपादीत केलेल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून पांजरापोळ ही ट्रस्टीची जमीन उद्योगासाठी संपादन करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. तरी पांजळापोळ ट्रस्टच्या जमिनीचे त्वरित संपादन करण्यात यावे, जेणेकरून इतर शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. या मागण्यांसाठी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी व आपापल्या कुटुंब-परिवारासह नाशिक ते मुंबई पायी धडक मोर्चा काढणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या मोर्चात अंबड व सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व मुलाबाळांसह या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर,रामदास दातीर,गोकुळ दातीर,अरुण दातीर,महेश दातीर,शांताराम फडोळ, ज्ञानेश्वर आहेर, सुभाष दातीर,सुखदेव दातीर, विष्णु दातीर
यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम