
देवळा ; गेल्या दोन महिन्यांपासून देवळा व चांदवड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्राप्त न झाल्यामुळे व विविध समस्यांबाबत आज (दि.१६)रोजी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीच्या नेत्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावर संघटनेच्या नेत्यांबरोबर शिक्षणाधकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली आणि तात्काळ संबंधित आस्थापना प्रमुखांना बोलावून समस्येचा निपटारा केला. याप्रसंगी राज्य जिल्हा व तालुका कार्यकारिणी चे सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,सरचिटणीस व पदाधिकारी उपस्थित होते.
पगारासाठी कमी अनुदान प्राप्त होत असल्याने काही तालुक्याचे पगार एक महिना उशिरा करावे लागत आहेत. त्यात देवळा तालुक्याला अनवधानाने सलग दोन महिने वेतनविलंब झल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबीवर शिक्षणाधिकारी महोदयांनी अनुदान प्राप्त होताच प्राधान्याने देवळा तालुक्यातील शिक्षकांचे पगार होतील अशी ग्वाही दिली.
शिक्षण विभाग देवळा येथे अनुभवी कनिष्ठ सहाय्यकाची नेमणूक करावी. देवळा तालुक्याची निर्मिती झाली तेव्हापासून पंचायत समिती देवळा शिक्षण विभाग हा स्वतंत्र आस्थापना नसल्यामुळे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातून तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी दिले जातात त्यामुळे कायमस्वरूपी कार्यालयीन कर्मचारी नेमणूक करावेत. सध्या संपूर्ण तालुक्यातील शिक्षकांची प्रशासकीय कामे दोन महिन्यांपासून प्रलंबित आहेत.एक कनिष्ठ सहाय्यक दीर्घ रजेवरआहेत तर शिपाई पदावर असलेल्या व्यक्तींची कनिष्ठ सहाय्यक म्हणून नेमणूक केल्याने विविध कामे ठप्प झाली आहेत.
पेसा क्षेत्रातील शिक्षकांचे प्रोत्साहन भत्ता फरक बिल लवकरात लवकर मिळावे. २०१२ पासूनचे चटोपाध्याय फरक बिल लवकरात लवकर मिळावेत. सहावा वेतन आयोगातील पाचवा हप्ता ज्या शिक्षकांचा बाकी आहे तो त्यांच्या फंडात जमा व्हावा. जानेवारी २०२१ पासून सातव्या वेतन आयोगातील न्यायालयीन प्रकरणात निकाल लागलेल्या शिक्षकांना एकस्तर मंजूर होऊन तो पगारात लागू करावा.
निवडश्रेणी प्रस्ताव मार्गी लावून जास्तीत जास्त शिक्षकांना त्याचा लाभ मिळावा. सेवा पुस्तक अपडेट करून सर्व नोंदींवर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या व्हाव्यात. गेल्या अडीच वर्षापासून मेडिकल बिल व विविध फरक बिल पेंडिंग आहेत ते शिक्षकांना लवकरात लवकर मिळावेत. या आणि अशा विविध मागण्यांबाबत शिक्षणाधिकारी महोदय व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.माननीय महोदयांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर समस्यांचा निपटारा होईल याबाबत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले.
प्रसंगी जिल्हा शिक्षक समितीचे आनंदा कांदळकर , केदु देशमाने,संघाचे धनराज वाणी, प्रदीप पेखले, समितीचे विजय आहेर,जनार्दन पगार, श्रीकांत देवरे, साहेबराव पवार, संघाचे संजय आहेर, थोरमिसे, नवनाथ जाधव, पदवीधर शिक्षक संघटनेचे भरत सावंत, प्रमोद आहेर, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बाप्पा महाजन, अनिल सावंत शिक्षक भारतीचे अक्षय निकम, प्रांजल भामरे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम