दिल्ली – पोर्तुगालमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एका भारतीय गरोदर महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री डॉ. मार्टा टेमिडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांच्या राजकीय नैतिकतेच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.
पोर्तुगीज मीडिया रिपोर्टनुसार, ३४ वर्षीय गर्भवती भारतीय महिला पर्यटनासाठी पोर्तुगालला आल्या. सदर महिलेला राजधानी लिस्बनमधील सांता मारिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, तेथील प्रसूती वॉर्डमध्ये बेड नसल्यामुळे तिथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करता आले नाही. तातडीने महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तिथेच हृदयविकाराच्या झटक्याने सदर महिलेचा मृत्यू झाला. मात्र, महिलेच्या गर्भातील बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष म्हणजे सांता मारिया हॉस्पिटल हे देशातील सर्वात मोठे रुग्णालय मानले जाते. पोर्तुगाल सरकारने या महिलेच्या मृत्यूप्रकरणी प्रशासकीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
कोण आहेत डॉ. मार्टा टेमिडो ?
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची आपली नैतिक जबाबदारी स्वीकारत पोर्तृगालच्या आरोग्यमंत्री डॉ. मार्टा टेमिडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. मार्टा टेमिडो या २०१८ पासून त्या देशाच्या आरोग्यमंत्री होत्या. कोरोना संकटातून पोर्तुगालला बाहेर काढण्याचं श्रेय त्यांना दिले जाते. मात्र त्यांनतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
पोर्तुगालमध्ये आरोग्यसेवा, खासकरून अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचा तुटवडा आहे. तसेच, गर्भवती महिलांना वेळेत सेवा मिळत नसल्याने तिथल्या आरोग्यमंत्र्यांवर सतत टीका होत होती. त्यातच भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर वाढता विरोध पाहता मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला. या पदावर राहण्यास आपण योग्य नसल्याचे सांगत त्या पायउतार झाल्या. मार्टा टेमिडो यांनी ह्या घटनेची जबाबदारी स्वीकारत राजकीय नैतिकतेचे दर्शन घडवले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम