ठाणे : कातकरी समाजातील कु. पूनम विजय हिलम वकील झाल्याने समाजात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. वाफे, ता. शहापूर, ठाणे सर्वांसाठीच ही अभिमानाची आणि आनंदाची घटना आहे. कातकरी समाज हा प्रिमिटिव्ह आदिवासी मानला जातो. त्यातली पूनम पहिली वकील. सनद घेतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. त्याही पेक्षा तिच्या चेहऱ्यावरचं तेज.
कातकरी समाजाचं अस्तित्वच नगण्य असून त्यांचे मतदार संघ आता अस्तित्वात नाहीत त्यांच्या वस्त्या क्वचित आढळतील महसुलातील नोंदही काही अंशी संपली असताना ही बातमी समाजासाठी महत्वाची ठरली आहे.
मुंबईच्या शेजारी ठाणे, पालघरमध्ये कातकरी आहे पण खूप कमी प्रमाणात. रायगडमध्ये तुलनेने मोठ्या संख्येने आहे. सगळा कातकरी समाज विस्थापित झालेला दिसून येतो.
नीरज हातेकरांनी फेसबुकवर पूनमबद्दल पोस्ट लिहली. याचा आनंद हातेकरांना होणं स्वाभाविक आहे. आदिवासींमध्ये काम करणारे लोक काही कमी नाहीत. हातेकरांचं वैशिष्ट्य असं की आपण आदिवासींसाठी काम करतो हे ते कधी सांगत नाहीत. आदिवासींचं नेतृत्व बिगर आदिवासींनी करू नये ही हातेकरांची भूमिका आहे. त्यामुळे आदिवासींमधलं नेतृत्व शोधण्याचं आणि त्यांना उचित संधी मिळण्यासाठी मार्गदर्शन करणं एवढीच त्यांनी आपली भूमिका निश्चित केली आहे.
कातकरी समाजातल्या या मुलीचं कौतुक यासाठी की आजही या समाजातील मुलं शिकत नाहीत. मुली तर बिलकुल नाहीत. वीटभट्ट्यांवरच्या त्यांच्या शोषणाच्या तर अनेक कथा आहेत. कुठे सालगडी तर कुठे वेठबिगारी. आदिवासींमधला सगळ्यात मागे पडलेला जो घटक आहेत त्यापैकी हा कातकरी आहे. (महाराष्ट्रात 1 लाखाच्या आसपास कातकरी कुटुंब आहेत. एकूण लोकसंख्येच्या 9.50 टक्के आदिवासी समाज राज्यात आहे.) त्यातून पूनम वकील होते म्हणून तिचं कौतुक आहे.
उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यातील आदिवासी मुलं तशी खूप पुढे गेली. महाराष्ट्रात त्यामानाने पुरोगामी राज्य असूनही हे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. ‘मरांग गोमके’ जयपाल सिंह मुंडा यांनी भारताला हॉकीमधलं पहिलं ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवून दिलं. संविधान सभेत योगदान दिलं. तरीही इतिहास लेखनात त्यांना जागा नाही. बिरसा मुंडा आणि जयपालसिंग यांचं उलगुलान पूनम हिलमच्या सनदेतून यापुढे प्रगटत राहील आणि जीवनाच्या सगळ्या आघाड्यांवर आदिवासी तरुणही त्याच स्वाभिमानाने पुन्हा उभे राहतील, ही अपेक्षा. पूनमला भरपूर शुभेच्छा!
– आमदार कपिल पाटील
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम