Pomegranate: ‘देवळा प्रोमोग्रेनेट ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी’ डाळिंब खरेदीसाठी मैदानात

0
22

Pomegranate: तालुक्यात नुकतीच शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या “देवळा प्रोमोग्रेनेट ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी” तर्फे आज मटाने येथे डाळिंब खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. नाबार्ड अंतर्गत तसेच युवा मित्रच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात नव्यानेच स्थापन झालेल्या “देवळा प्रोमोग्रेनेट ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीने” आपली वाटचाल सुरू केली असून खरेदी विक्री क्षेत्रात पाऊल टाकल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढावी तसेच डाळिंब वर प्रक्रिया उद्योग देखील भविष्यात उभारले जाणार असल्याची माहिती संचालक मंडळाने दिली आहे. आज रोजी डाळिंब खरेदीचा शुभारंभ मटाने येथे करण्यात आला. 77 रू. प्रति किलो दराने खरेदी करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आपले डाळिंब असल्यास गुंजाळवाडी येथील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

या नव्याने स्थापन झालेल्या कंपनीत तालुक्यातील वेगवेगळ्या विभागातून संचालक नेमण्यात आले आहेत, यात अध्यक्षपदी रवींद्र दादाजी जाधव, सचिवपदी जगदीश नानासाहेब शिंदे तर संचालक म्हणून रामचंद्र पंडित आहेर, दीपक सुकदेव देवरे, शीतल योगेश गुंजाळ, अंकुश खेमराज सोनवणे, मुकेश भाऊसाहेब भदाणे, सरला यशवंत देवरे, लक्ष्मण भास्कर माळी, सतीश हिरामण जाधव हे संचालक म्हणून काम पहात आहेत. मयुर संजय ठाकरे सीईओ म्हणून तर तूषार उत्तम सोनवणे हे अकाऊंट विभागाचे काम सांभाळत आहेत.

डाळिंब चे महत्व
डाळिंब हे गोड आणि अतिशय चविष्ट फळ असून अनेक आजारांवरही ते गुणकारी आहे. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. ते व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी (Vitamin C & B)चा उत्तम स्त्रोत आहे. डाळिंबामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक (जस्त) मोठ्या प्रमाणात असते.

डाळिंबाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. विविध पोषक घटकांचा स्रोत म्हणून डाळिंब (Pomegranate) ओळखले जाते. डाळिंबामध्ये विविध पोषक घटक, खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, अँथोसायनिन्स, प्युनिकिक ॲसिड, एलाजिटानिन्स, अल्कलॉइड्स, फ्रुक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज तसेच लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम ही खनिजे मुबलक प्रमाणात असतात. डाळिंबामध्ये ॲन्टिऑक्सिडंट गुणधर्म (Antioxidant Properties In Pomegranate) असतात. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. रक्तदाब नियंत्रणात राहतो. डाळिंबाच्या रसाच्या (Pomegranate Juice) सेवनामुळे हृदयाचे कार्य सुधारते. हृदयरोगापासून बचाव होतो. तसेच कर्करोग पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते.

पोषक घटकांचे प्रमाण

घटकद्रव्ये—प्रमाण (टक्के) किंवा प्रति १०० ग्रॅम

१.पाणी—७८%

२.प्रथिने—०.६%

३.स्निग्ध पदार्थ—०.१%

४.कर्बोदके—१४.५%

५.तंतुमय पदार्थ—५.१%

६.खनिजे—०.७%

७. कॅल्शिअम—१० मिलिग्रॅम

८.लोह—०.२ मिलिग्रॅम

९.जीवनसत्त्व क—१४ मिलिग्रॅम

आयुर्वेदामध्ये डाळिंबाला विशेष महत्त्व आहे. विविध औषधांच्या निर्मितीसाठी डाळिंबाचा वापर करण्यात येतो. डाळिंब फळ, ज्यूस, मुळे, फुले, बियांचे तेल, खोडाची साल आणि दाण्यांचा वापर वेगवेगळ्या आजारांमध्ये उपचार पद्धतीसाठी केला जात असे.

डाळिंब फळाचे महत्त्व

– शरीरातील वात आणि कफाचे त्रास कमी होतो.

– हातपायांची आग होणे, अंगाची आग होणे, मूत्रविसर्जनावेळी जळजळ होणे आदी विकारांसाठी गुणकारी आहे.

– हृदयाच्या विविध आजारांसाठी डाळिंब बिया गुणकारी असतात.

– लहान-मोठ्या आतड्यांच्या पेशींच्या आकुंचन-प्रसरणाचे कार्य सुरळीत ठेवण्याचे कार्य पूर्ण पिकलेले डाळिंब फळ करते.

– डाळिंबाच्या मुळ्या या जंतुनाशक आहेत.

– डाळिंबाची साल आणि बियांचे चूर्ण वाताच्या आणि कफदोषावर गुणकारी आहे.

– अपक्व डाळिंब फळांचा रस पचनास उपयुक्त मदत करतो.

– उलट्यांच्या त्रासामध्येही डाळिंब फायदेशीर ठरते.

– डाळिंबाच्या नियमित सेवनाने मेंदूचे आजार, मूत्रपिंडाचे विकार उद्‌भवत नाहीत.

– डाळिंबाच्या फळाची साल, फूल, धणे, मिरी किंवा दालचिनी यांचे मिश्रण अतिसारावर गुणकारी आहे.

– पिकलेल्या फळातील बिया आणि रस पोटातील वायुदोष कमी करण्यास मदत करतात.

डाळिंब रसाचे फायदे

– गोड डाळिंबाचा रस हे तृप्त करणारे पेय आहे. अशक्तपणामध्ये डाळिंब रसाचे सेवन करावे.

– डाळिंबाचा रस पित्तशामक, रोगप्रतिकारक आहे.

– डाळिंब रसाच्या सेवनामुळे भूक वाढते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

– खडीसाखर आणि डाळिंब रस यांचे सेवन केल्यास पोटातील जळजळ, आंबट ढेकर आणि लघवीवेळी होणारी आग कमी होते.

– ताप अधिक वाढल्यास घशातील कोरड, लघवीचा त्रास आणि जळजळ कमी करण्याकरिता डाळिंबाचा रस उपयुक्त आहे.

– डाळिंब रसाचे सेवन केल्यास त्वरित ताजेतवाने वाटते.

– यकृत, हृदय व मेंदूचे आजार कमी होतात व कार्यक्षमता वाढत.

– अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळिंब रस गुणकारी आहे.

– डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.

– शरीरातील उष्णता कमी होते.

– डोळे येणे या संसर्गजन्य आजारात जास्त प्रमाणात डोळ्यांचे जळजळ होते. अशावेळी डाळिंब रसाचे २ थेंब डोळ्यात टाकल्यास आराम मिळतो.

– उच्च रक्तदाबावर डाळिंब रस गुणकारी मानला जातो.

– डाळिंब रस कफनाशक आहे. रसातील टॅनिन व अॅक्झालिक आम्ल कफनाशक आणि अनेक व्याधींवर गुणकारी आहे.

डाळिंब झाडाच्या विविध भागांचे फायदे

सालीचा उपयोग

– पोटातील कृमी नष्ट करण्यासाठी उपयुक्त.

– सालीचे चूर्ण हिरड्यांमधला रक्तस्राव व हिरडेदुखी या आजारावर गुणकारी आहे.

– काही कारणाने घसा दुखत असेल तर हळदीसोबत सालीचा काढा घ्यावा. आराम मिळतो. वारंवार त्रास होत असल्यास, ताकासोबत सालीचा काढा घ्यावा.

– उन्हाळ्यात बऱ्याच लोकांच्या नाकातून रक्त येते. अशावेळी सालीचा अर्क उपयुक्त ठरतो.

– सालीपासून आयुर्वेदिक दंतमंजन तयार करता येते. या दंतमंजनाने दात घासल्यास दात पांढरेशुभ्र व बळकट होतात.

– डाळिंबाच्या सालीपासून टॅनिन हा घटक मिळतो. याचा विविध औषधांच्या निर्मितीमध्ये वापर केला जातो.

पानांचा उपयोग

– डोळ्यांना जळजळ होत असल्यास डाळिंबाच्या पानांचा लेप करून पापण्यांवर लावावा. जळजळ कमी होते.

– अनेकांना अतिप्रमाणात घाम येतो. घामामुळे शरीराला दुर्गंधीयुक्त वास येतो. अशावेळी पानांचा रस काढून त्याने मालिश करावी. दुर्गंधी कमी होते. त्वचा उजळते.

फुलांचा उपयोग

– फुलांचे चूर्ण करून त्याचे सेवन केल्यास जुलाब कमी होतात.

– फुलांचे चूर्ण क्षयरोगावर अतिशय गुणकारी असते.

– नाकातून रक्त येत असल्यास डाळिंब फुलांच्या रसाचे २ थेंब नाकात टाकावेत.

– शारीरिक जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी फुलांचे चूर्ण करून लावावे.

मुळ्यांचा उपयोग

– डाळिंबाच्या मुळ्यांचा काढा रिकाम्यापोटी घेतल्यास पोटदुखी थांबते.

– लहान मुलांच्या पोटात जंत होतात. जंतावर डाळिंब मुळ्यांचा काढा गुणकारी असतो.

डाळिंब झाडाच्या सालीचा उपयो

– डाळिंब झाडाच्या सालीला तुरट चव असते. ही साल चघळल्यास तोंडाला सतत पाणी सुटणे, अति प्रमाणात थुंकी येणे आदी दोष कमी होतात.

– झाडाच्या सालीचे चूर्ण घेतल्यास जुलाब थांबतात.

– नाकातील रक्तस्राव थांबविण्यासाठी झाडाची साल गुणकारी आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here