दिल्ली – उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले. याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा कट तेलंगणातून रचण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे पोस्टर तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्याने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमार्फत छापून घेतले होते.
शहरात रिझर्व्ह पोलिस लाईनजवळील मुख्य रस्त्यावर अज्ञात लोकांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात संदेश असलेले होर्डिंग लावले होते. भाजप युवा मोर्चाच्या नेत्यासह तिथे येणाऱ्या लोकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली, त्यानंतर शनिवारी हे होर्डिंग हटवण्यात आले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. होर्डिंग लावणारे मजूर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.
या प्रकरणी पोलिसांनी इव्हेंट कंपनीचे संचालक, प्रिंटिंग प्रेसचा मालक आणि होर्डिंग लावणाऱ्या मजूरांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्या कंपनीचे संचालक अनिकेत केशरवानी यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना साई नावाच्या एका व्यक्तीने फोन केला होता, तो तेलंगणाचा असल्याचे सांगितले. तसेच त्याने पोस्टर छापण्यासाठी १० हजारांचे कंत्राट देखील दिले होते.
पोस्टरमध्ये काय लिहिले होते ?
पंतप्रधान मोदींच्या विरोधात लावण्यात आलेल्या या होर्डिंग्जमध्ये #ByeByeModi असा हॅशटॅग होता आणि त्यात रद्द झालेले कृषी कायदे, कंत्राटी नोकऱ्या, स्वयंपाकाच्या गॅसची वाढती किंमत इत्यादी मुद्द्यांचा समावेश होता. ‘कृषी कायद्याला विरोध करताना तुम्ही अनेक शेतकर्यांचा बळी घेतला आहे’ आणि ‘कंत्राटी नोकऱ्यांमुळे तरुणांची स्वप्ने नष्ट झाली आहेत’, असे या होर्डिंग्जवर लिहिले होते. यात पीएम मोदींचे व्यंगचित्र देखील दाखवण्यात आले आहे, ज्यासोबत 1105 रुपये किमतीचा गॅस सिलिंडर देखील दाखवण्यात आले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम