द पॉइंट नाऊ: बाजार हस्तक्षेप योजना राबविणाऱ्या नाफेडने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा जिल्ह्यातच विक्री केल्यामुळे जिल्ह्यांतर्गत कांद्याचे भाव कोसळले. शिवाय, खरेदी केलेला कांदा उशिराने बाजारात आणून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करून नाफेडच्या कांदा खरेदी-विक्रीची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून त्याचा अहवाल पंतप्रधानांच्या पोर्टलवर जाहीर करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाफेडने खरेदी केलेल्या कांद्यावर चर्चा झाली. त्यावेळी नाफेडचे अधिकारी शैलेशसिंह यांनी नाफेडने जिल्ह्यात दोन लाख, ३८ हजार मेट्रीक टन शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याचे सांगितले.
त्यापैकी १७ हजार टन कांदा दिल्ली येथील गुदामात तर उर्वरित कांदा नाशिक, नगर, पुणे, वैजापूर या ठिकाणी ठेवण्यात आला असून, गेल्या सहा महिन्यात फक्त २२ हजार टन कांद्याची विक्री झाल्याची माहिती दिली. त्यावर पालकमंत्री भुसे व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
नाफेडने कांद्याची विक्री उशिराने केल्यामुळे खरेदी केलेला ४० टक्के कांदा खराब झाला आहे. या व्यवहारांची जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडाभरात तपासणी करावी व त्याचा अहवाल पंतप्रधान यांच्या पोर्टलवर अपलोड करावी, असे निर्देश भुसे यांनी दिले.माहितीची सत्यता तपासून पाहण्यासाठी वाणिज्यमंत्री गोयल यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा ज्या राज्यात कांदा उत्पादीत होत नाही त्या राज्यात विक्री करणे अपेक्षित असताना अधिकायांनी नाशिक जिल्ह्यातच कांद्याची विक्री केली.
परिणामी, जिल्ह्यातील कादा उत्पादकांना भाव मिळू शकला नाही असा आरोप करून, मुद्दामहून कांद्याची विक्री लांबणीवर टाकण्यामागे शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप भुसे यांनी केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम