सुरगाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलावाचा शुभारंभ शुक्रवारी माजी आमदार जे. पी. गावित व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सावळीराम पवार यांच्या हस्ते झाला.
आशिया खंडातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्याला जागतिक स्तरावर ओळख आहे. तसेच कांद्याची पंढरी म्हणून देखील नाशिकला ओळखलं जातं. सर्वाधिक प्रमाणावर कांदा हा नाशिक जिल्ह्यात उत्पादित केला जात असल्याने या ठिकाणी अनेक ठिकाणाहून व्यापारी येत असतात. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजारपेठांमध्ये दररोज हजारो क्विंटल कांद्याची उलाढाल होत असते. मात्र सुरगाणा बाजार समितीमध्ये आजपर्यंत कांद्याचा लिलाव झाला नव्हता. यामुळे सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांना इतरत्र जावे लागत होते. याचीच दखल घेत आजपासून सुरगाणा बाजार पेठेमध्ये कांदा लिलावाला सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी बाजारपेठच नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी इतर बाजारपेठांमध्ये धाव घ्यावी लागत होती. मात्र यामध्ये देखील चांगला भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत होता.
बाजार समितीत पहिल्यांदाच कांदा लिलाव होत असल्याने पहिल्या दिवशी सरासरी पाच टन कांद्याची आवक झाली होती. यावेळी प्रति क्विंटल भाव जास्तीत जास्त ९०३ रुपये तर कमीत कमी २१० रुपये भाव मिळाला. सरासरी भाव ४९४ रुपये होता. यावेळी ६ व्यापारी व १० ते १२ शेतकरी सहभागी झाले होते. तर बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला असून यावेळी शेतकरी सुखावल्याचं बघायला मिळालं.
यावेळी उपसभापती सुभाष चौधरी, सहायक निबंधक सी. टी. भोये, सचिव जगदीश आहेर, सर्व संचालक मंडळ, व्यापारी धर्मेंद्र पगारिया, उत्तम पगारिया, संतोष बागुल, प्रशांत पिंगळे, अजिंक्य भवर, विलास कुशारे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलाव शुभारंभा प्रसंगी माजी आमदार जे. पी. गावित, सभापती, उपसभापती व संचालक मंडळ उपस्थित होते
सुरगाणा बाजार समितीत कांदा लिलाव सुरू झाल्याने आम्हा शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. पिंपळगाव येथे कांदे विक्रीस घेऊन जाण्यासाठी ट्रॅक्टरचे चार ते पाच हजार रुपये भाडे मोजावे लागत होते. यामुळे आमचा वेळ व पैशांची बचत होणार आहे. समितीने नियमित कांदा लिलाव सुरू ठेवावा, अशी आमची मागणी आहे. – संजय शंकर भोंडवे, शेतकरी, आंबूपाडा
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..