नाशिक: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कांदा अनुदान मिळण्याची प्रक्रियेस सुरवात झाली आहे. सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ रुपये वर्ग करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम बुधवारी उशिरापर्यंत सुरू होते. हे कामकाज विभागासह बाजार समित्यांचे सचिव आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी या मदतीपासून वंचित राहत असेल किंवा काही टेक्निकल अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. शेतकरी मदतीपासून वंचित राहिला नको याबाबत सबंधित यंत्रणेला देखील सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हा अनुदानापासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात हे अनुदान देण्यात येणार असून दुसरा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. योग्य खाते क्रमांक नसल्यास संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क करून योग्य खाते क्रमांक घेण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली त्यानुसार ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात होणार आहे. राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरवातीला कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सहकारी आणि खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक अथवा ‘नाफेड’कडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ ला विकलेल्या लेट खरीप कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने २७ मार्च २०२३ ला घेतला. क्विंटलला ३५० रुपयेप्रमाणे २०० क्विंटलपर्यंत अनुदान सरकारने जाहीर केले.
सरकारने घोषणा केल्यानुसार ३ ते ३० एप्रिलला शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार प्रस्तावाची तपासणी सरकारी लेखापरीक्षक यांच्यातर्फे करण्यात आली. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम