द पॉईंट नाऊ ब्युरो : मागील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील निखिल भामरे याचाही समावेश आहे. मात्र निखिल यास एक महिना तुरुंगवास भोगावा लागल्याने उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
बागलाण तालुक्यातील निखिल भामरे या 22 वर्षीय तरुणाने शरद पवार यांबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. पवार यांना जीवे मारण्याबाबत हे ट्विट होते. असे म्हणत याप्रकरणी निखिलवर गुन्हा दाखल करण्यात येऊन, त्याला एक महिना तुरुंगवास भोगावा लागला. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले आहे. तुम्ही असे करून पवारांचीच प्रतिष्ठा कमी करत आहात, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, निखिल भामरे हा फार्मसीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याच्याविरोधात 13 मे रोजी एफआयआर नोंदवून मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले.
याआधी निखीलवर नाशिकसह मुंबई आणि ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर निखिलला अटक करण्यात आली होती. त्याने जामिनासाठी अर्ज करताना, दाखल करण्यात आलेल्या एफआयआर रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती.
टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील शरद पवार यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तिच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात आली होती.
मागील काही दिवसांत काही बड्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या बऱ्याच घटना घडल्या. यामुळे सोशल मीडियाचा आणि मिळालेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा होत असलेला गैरवापर यावरून चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, निखिल भामरे यांच्याबद्दल न्यायालयाने सुनावणी करतांना, एक विद्यार्थी एक महिना तुरुंगात राहतो हे बरोबर नाही. राज्य सरकारने संबंधित विद्यार्थ्याची तात्काळ जामिनावर सुटका करण्यास हरकत नसल्याचे निवेदन न्यायालयात दिल्यास, राज्याची प्रतिष्ठाही कायम राहील असे मत नोंदवून राज्य सरकार आणि पोलिसांना याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे तोंडी निर्देश दिले आहेत.
आता याबाबत राज्य सरकार आणि पोलीस काय भूमिका स्पष्ट करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निखिल हा एक विद्यार्थी असल्याने, त्याचे शैक्षणिक नुकसान देखील होऊ नये, या उद्देशाने न्यायालयाने हे तोंडी निर्देश दिल्याची चर्चा होऊ लागली आहे. आता निखिल याची सुटका होणार का? आणि ती झाली तर कधी? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम