नाशिक : जिल्ह्यातील टॉप १०० थकबाकीदारांची यादी जाहीर करून त्यानंतर केलेल्या धडक कारवाईनंतर आता नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपला मोर्चा विविध तालुक्यांतील टॉप १५० थकबाकीदारांकडे नेला आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनेक सदस्यांकडे तब्बल २०० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. त्यातील सर्वाधिक थकबाकी ही सिन्नर व कळवण तालुक्यात आहे. बँकेच्या सिन्नर तालुक्यातील ५४३८ सभासदांकडे तब्बल ५४ कोटी ५३ लाख ३० हजार रुपयांची थकबाकी आहे. तर कळवण तालुक्यात एकूण २९९० थकबाकीदारांकडे जवळपास ४९ कोटी ६४ लाख ३८ हजारांची थकबाकी आहे. म्हणजेच तब्बल १०० कोटींहून अधिक थकबाकी ह्या दोन तालुक्यातील सदस्यांच्या आहेत.
त्यामुळे बँकेने वारंवार आवाहन करूनही अद्याप कर्जाच्या रकमा न भरणाऱ्या ह्या दोन तालुक्यातील टॉप १५० मोठ्या थकबाकीदारांची नवे जाहीर करून त्यांच्यावर जिल्हा बँक कडक कारवाई करणार असल्याची माहिती दोन्ही तालुक्याचे विभागीय अधिकारी भारत आरोटे व जयवंत बोरसे यांनी दिली आहे.
या कारवाईसाठी जिल्हा बँक तालुक्यातील सहकार खात्याचे सहायक निबंधकांचे मार्गदर्शन घेतले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे विभागीय अधिकारी, कर्मचारी व विशेष वसुली पथक यांनी युध्दपातळीवर काम सुरु केले आहे. त्यानुसार सिन्नर तालुक्यातील ५४३८ सभासदांपैकी १०६० सभासदांचे १०१ दाखले सरकारी दप्तरी असून त्यापैकी २७८ सभासदांच्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश देण्यात आले आहे. तर कालवण तालुक्यातील २९९० थकबाकीदारांपैकी १९३६ सभासदांचे दाखले असून त्यापैकी ७३८ थकबाकीदारांची सहकार कायद्यातील कलम १०१ अन्वये मालमत्ता जप्तीची कार्यवाही बँकेकडून सुरु आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी सेवक संचालक कैलास निरगुडे म्हणाले, सध्या तालुक्यातील टॉप १५० थकबाकीदार सभासदांवर तातडीने कारवाई सुरु करण्यात आली आहे. थकबाकीदार सभासदांना कर्जाचा भरणा व्याजासह भरणेकामी अंतिम नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी त्वरित आपल्या थकीत रकमा भरून सहकार्य करावे व जिल्हा बँकेस गतवैभव प्राप्त करून द्यावे, असे आवाहन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम