नाशिक प्रतिनीधी : पेट्रोल डिझेल आपल्या गाडीत भरले नसेल तर आजच टाकी फुल करून ठेवा कारण केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी तसेच सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यासह देशातील पेट्रोल पंप चालकांनी बुधवार (दि.31) रोजी पेट्रोल आणि डिझेलची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या आंदोलनात नगर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक सहभागी होणार असल्याची माहिती पेट्रोल पंप चालक संघटनेचे दिली. या आंदोलनात पंप चालक इंधन खरेदी करणार नसले तरी विक्री मात्र, सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारने 2017 पासून पेट्रोल आणि डिलर्सचे डिलर मार्जिन वाढलेले नाही. यात शासन व ऑईल कंपन्यांसोबत झालेल्या करारानूसार दहा सहा महिन्यांनी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देेशांकाशी निगडीत केले असतांनाही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
दुसरीकडे 2017 पासून आतापर्यंत इंधनाच्या किंमती दुप्पट झालेल्या आहेत. यामुळे पंप चालकांना गुंतवणूक खर्च, बँकांचे व्याज, पगार, वीज बिल, बाष्पीभवन, विविध शासकीय कर आदी खर्च दुप्पट भरावा लागत आहेत. त्यातच सरकारने दोन वेळा 4 नोव्हेंबर 2021 व 21 मे 2022 एक्साईज कपात जाहीर केली व इंधनाच्या किंमती सुमारे 8 ते 12 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी ताबडतोब करायला लावली आहे.
प्रत्यक्षात डिलर्सनी जास्त दराने एक्साईज भरून माल खरेदी केला होता व तो माल विक्री करतांना त्याला कमी केलेल्या एक्साईज दराने विक्री करायला बंधनकारक केले. डिलर्सच्या नफ्यात नुकसान झाले तर समजू शकतो मात्र इथे तर त्याच्या मुद्दलामध्ये घट झाली. यामुळे संपूर्ण देशात सुमारे 3 हजार कोटींचे नुकसान झाले. यामुळे डिलर्स यांना नुकसानीमुळे नवीन माल खरेदी करणे कठीण झाले आहे.
पंप चालकांचा इंधनाचे दर कमी करण्यास पाठिंबा आहे. मात्र, शासनाने स्वत: 16 जून 2017 रोजी सुरू केलेली डेली प्राईस चेंज पध्दत अचानक बदलून स्वत:ला व ऑईल कंपन्यांना सोयीच्या घोषणा करतांना डिलर्सचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आहे. कबूल केलेली डायनामिक प्रायसिंग कंपनीकडून पाळली जात नाही. त्यामुळे पूर्वीची 15 दिवसांची दर बदलण्याची पध्दत सुरू करावी अशी पंप चालक संघटनेची मागणी आहे.
यासाठी 31 मे रोजी एक दिवस खरेदी बंद ठेवून शासन व ऑईल कंपन्यांचे लक्ष वेधून एकजुटीचे प्रदर्शन करण्यासाठी हे लाक्षणिक आंदोलन असून बुधवारी खरेदी बंद राहणार असली तरी विक्री सुरू राहणार असल्याचे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितल यामुळे काहीसा दिलासा असणार आहे
दरम्यान भारत पेट्रोलियम कंपनीने गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या इंधन पुरवठा थांबविला असून त्यामुळे जनतेला इंधनाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास त्याला डिलर्स नव्हे, तर कंपनी आणि केंद्र सरकार जबाबदार राहणार असल्याचे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे. यावर सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम