
देवळा : मविप्र संस्थेच्या हितासाठी शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता यासोबत खर्चात काटकसरीचे धोरण ठेवल्याने संस्थेची वाटचाल विकासाच्या दिशेने आहे. शाखाविस्तारासह संस्थेचे आर्थिक बजेट साडेतीनशे कोटींवरून साडे आठशे कोटींवर नेले.

सभासदांच्या तसेच शिक्षक व सेवक कर्मचारी यांच्या हितासाठी केलेले काम आणि त्यावर आपला विश्वास यातून एकहाती पॅनल निवडून द्याल याची मला खात्री आहे असा आशावाद प्रगती पॅनलच्या प्रमुख निलीमाताई पवार यांनी व्यक्त केला. देवळा येथे प्रगती पॅनलच्या शनिवार (दि.१३) रोजी झालेल्या सहविचार मेळाव्यात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ सभासद डॉ. बाबाजी ह्याळीज अध्यक्षस्थानी होते.
निलीमाताई पवार पुढे म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात मविप्र संस्थेच्या १६७ शाखा वाढवल्या, तीनशे एकर नवीन जमीन खरेदी केली, २९४ कोटींची बांधकामे केली. याशिवाय कोरोनाकाळात सर्व सेवकांना आर्थिक संरक्षण दिले. तसेच लवकरच ग्रामीण भागात सीबीएसई स्कुल चालू करत संस्थेची गुणवत्ता वाढ केली जाणार आहे. यावेळी दिनकर जाधव, रा.पा.आहेर, दिलीप पाटील, अशोक थोरात, रावसाहेब शिंदे, गोपाळराव वाघ, दगडू भामरे, प्रमोद पाटील, योगेश आहेर, डॉ.विलास बच्छाव, डॉ.सुनील ढिकले, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर, डॉ.व्ही.एम.निकम आदींनी मनोगते व्यक्त केली.
दरम्यान इच्छुक उमेदवारांच्या पॅनल कमिटीच्या वतीने मुलाखती घेण्यात आल्या. या सभेस माणिकराव बोरस्ते, डॉ.तुषार शेवाळे, रामचंद्र बापू पाटील, सुरेशबाबा पाटील, यशवंत आहिरे, सुरेश निकम, नानासाहेब महाले, दिलीप मोरे, सचिन पिंगळे, डॉ.प्रशांत पाटील, हेमंत वाजे, उत्तमबाबा भालेराव, माणिकराव शिंदे, अशोक पवार, डॉ.आत्माराम कुंभारडे, शाम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना केदा आहेर आपल्या मनोगतात म्हणाले की, ही शैक्षणिक संस्था असल्याने यात राजकारण न करता शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या कामाला न्याय द्यायला हवा. त्यामुळे देवळा तालुक्यातील सभासद निश्चितपणे प्रगती पॅनलला साथ देतील. डॉ.सुनील ढिकले यांनी विरोधी पॅनल दिशाभूल करणारे राजकारण करत आहे असा आरोप केला. योगेश आहेर, डॉ.विश्राम निकम यांनी दिवंगत डॉ.वसंतराव पवार व निलीमाताई पवार यांनी संस्थेस दिलेल्या योगदानाबद्दल सांगितले. तर माजी संचालक प्रमोद पाटील यांनी देवळा तालुक्यास दोन पदांची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. या मेळाव्यास देवळा, तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रवीण मेधने यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम