नाशिक – शेतकरी-कष्टकरीवर्ग व सर्वसामन्यांचा आवाज, विक्रमी ९ वेळा नंदुरबारचे खासदार राहिलेले व शेवटच्या श्वासापर्यंत कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे आज नाशिकमध्ये अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले आहे.
प्रकृती अस्वस्थेमुळे नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी माजी आमदार निर्मला गावित व दोन मुली, आणि मुलगा जि.प. सदस्य भारत गावित, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, उद्या त्यांच्यावर मुळगावी नंदुरबारमधील नवापूर येथे अंत्यसंस्कार होणार आहे, असे त्यांचे पुत्र भारत गावित यांनी सांगितले आहे.
!!..भावपूर्ण श्रद्धांजली..!! pic.twitter.com/HBrrdv4evN
— Bharat Manikrao Gavit (@Bharatgavit1971) September 17, 2022
माणिकराव गावित यांची राजकीय कारकीर्द :
माणिकराव गावित यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३४ रोजी नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे झाला. अत्यंत खडतर व कष्टमय बालपणातून गेलेल्या माणिकराव यांची कारकीर्द १९६५ पासून सुरु झाली. ते १९६५ साली नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातून सदस्य म्हणून निवडून आलेत. तसेच, १९७१ ते १९७८ पर्यंत त्यांनी धुळे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती म्हणून काम पहिले. त्यानंतर ते १९८० साली नवापूरचे आमदार झाले. व त्याच्या पुढच्याच वर्षी १९८१ मध्ये प्रथमच खासदार झाले. तेव्हापासून ते २०१४ पर्यंत विक्रमी सलग ९ वेळा त्यांनी नंदुरबारची खासदारकी भूषवली आहे. विशेष म्हणजे, ते अनेकदा लोकसभेवर प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्यामुळेच २००४ च्या डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहराज्यमंत्री बनले. २०१३ लाही त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषविले होते. तसेच त्यांनी काहीकाळ लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कामही पहिले आहे.
माणिकराव हे अत्यंत सध्या पद्धतीने जगणारे नेते होते. आदिवासी समाजावर त्याकाळी होणाऱ्या अन्यायामुळे पेटून उठलेला युवक अशी त्यांची ओळख होती. तसेच, सुरुवातीपासूनच नेतृत्वाचे गुण त्यांच्या अंगी असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. तसेच ते शेवटपर्यंत कॉंग्रेस पक्षाशी निष्ठावंत राहिल्याने त्यांना कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनही ओळखले जात असे. गावित यांच्या निधनामुळे काँग्रेसचा मार्गदर्शक नेता व आदिवासी समाजाचा आवाज हरपल्याची भावना निर्माण झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम