मुंबई – जर तुमच्या वाहनांवर ‘पोलीस’ असे नाव असलेली पाटी असेल किंवा पोलीसाचा लोगो लावला असेल, तर तो त्वरित काढून टाका. कारण पोलीस अश्या सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपला दरारा निर्माण करण्यासाठी अनेक पोलीस कर्मचारी व त्यांचे नातेवाईक आपल्या खासगी वाहनावर पोलीस असे लिहितात, किंवा ते पोलीस दलाचा लोगो लावतात. मात्र, ही गोष्ट अशांना चांगलीच महागात पडणार आहे. कारण, नांदेड परिक्षेत्रातील परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात अशा वाहनांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यासाठी आजपासून ७ दिवस ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. तशा सूचना नांदेड परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधिक्षकांना देण्यात आलेल्या आहेत.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार, ट्रान्सपोर्ट व नॉन-ट्रान्सपोर्ट वाहनांवर पोलीस नावाचा लोगो लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असतानाही पोलीस दलात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचारी आणि नातेवाईक पोलिसी खाक्यापासून वाचण्यासाठी खासगी वाहनांवर पोलीस नावाचे स्टिकर अथवा लोगो लावले जातात. मात्र, आता अश्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परभणी, नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांत आजपासून सात दिवस विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
याबद्दलचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. तसेच केलेल्या कारवाईचा प्रकार, एकूण कारवाईची संख्या आणि त्यातून वसूल करण्यात आलेला दंड याचा नियमित अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक यांना द्यावा लागणार आहे. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी अश्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत असताना नांदेड परिक्षेत्राने सुरु केलेल्या ह्या मोहिमेचे कौतुक होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम