
देवळा : कोळी महादेव समाजावर होत असलेल्या अन्याय बाबत शबरी घरकुल यादीमध्ये राजकीय द्वेशाने प्रेरीत होवुन पात्र लाभार्थ्यांना डावलून मर्जीतील संबंधित कुटुंबाची नावे समाविष्ट करण्यात आल्याची तक्रार लोहोणेर ता देवळा येथील आदिवासी कोळी महासंघाचे तालुका अध्यक्ष योगेश पवार यांनी कळवणचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शुक्रवारी( दि ७) रोजी केली .

शबरी घरकुल यादीत अन्याय झाल्याच्या तक्रारीचे निवेदन प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे देतांना आदिवासी कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष योगेश पवार आदी (छाया – सोमनाथ जगताप)
निवेदनाचा आशय असा की,
लोहोणेर गावातील गोरगरीब आदिवासी कोळी महादेव समाजावर प्रशासनाने अन्याय केला असून, शबरी घरकुल यादीचा फेरसर्वे करावा अन्यथा संबंधित प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून रास्ता रोको व कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येईल . देवळा तालुक्यात व लोहोणेर गावात कोळी महादेव समाज मोठ्या प्रमाणात राहत असून जाणून बुजून या समाजाला शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. ज्यावेळेस मा. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण विभागातून पंचायत समितीला घरकुल यादी प्रस्ताव सादर करण्यासाठी आदेश दिले त्यानंतर पंचायत समितीने ग्रामपंचायतींकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी हे आदेश देण्यात आले होते. लोहोणेर ता. देवळा येथून 46 प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले होते . यात 25 कोळी महादेव समाजाचे प्रस्ताव पूर्ण करून पाठवण्यात आलेले होते. यात कोळी महादेव समाजाचे सर्व प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. व नामंजूर प्रस्ताव बाबत ग्रामपंचायतीला कळविण्यात आले नाही . याची माहिती मिळावी तसेच तेरा प्रस्ताव मंजूर केले आहेत ते पूर्ण भिल्ल समाजाची आहेत . व पात्र महादेव कोळी समाज बांधवांना डावलण्यात आले आहे.
पंचायत समितीच्या कार्यालयात बसूनच लाभार्थीची यादी तयार करण्यात आली असून, राजकीय हेतूने प्रेरीत होवुन मर्जीतील सदन लोकांना पात्र यादीत स्थान दिले आहे. त्यामुळे गरीब व खरे गरजू लाभार्थी शबरी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिलेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कोळी महादेव समाजाला न्याय मिळावा . अन्यथा संबंधित कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम