दिल्ली – उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा त्याच्या निर्णयाने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे.
हुकूमशहा किम जोंग उन याने उत्तर कोरियात एक नवा कायदा लागू केला आहे. ज्यात त्याने आपल्या देशाच्या लष्कराला शत्रूंवर परस्पर आण्विक हल्ले करण्याचे अधिकार दिले आहे. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तर कोरियामध्ये अनेकदा क्षेपणास्त्र चाचण्या आणि आण्विक शस्त्रास्त्रांवर चर्चा होत असते. त्यातच उत्तर कोरियाचा हुकूमशहा नेहमीच आपल्या अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्राचा परीघ वाढवण्यात गुंतलेला असतो. दरम्यान, संयुक्त राष्ट्रप्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनीही उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांबाबतच्या या नव्या कायद्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच, गुटेरेस यांनी प्योंगयांगला चिरस्थायी शांतता राहण्यासाठी व कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्ण आणि सत्यापित अण्वस्त्रमुक्तीसाठी प्रमुख पक्षांशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचेही आवाहन केले आहे.
काय आहे हा कायदा ?
उत्तर कोरियाच्या संसदेत हा कायदा संमत झाला आहे. ज्यामुळे तिथल्या लष्कराला शत्रूंवर परस्पर आण्विक हल्ले करण्याचे अधिकार मिळाले आहे. उत्तर कोरियाने आपल्या धोरणात्मक आण्विक मोहिमेची व्याप्ती सतत वाढवली पाहिजे. जेणेकरून आण्विक युद्धाची क्षमता मजबूत करून शत्रू राष्ट्राला चोख प्रत्युत्तर देता येईल, असे किम जोंग यापूर्वी म्हणाला होता.
यासोबतच किम जोंग उनने अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशांनी धमकी दिल्यास उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा सक्रिय वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम