करकंब प्रतिनिधी : १६ ऑगस्ट २०२२ रोजी काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृध्दाश्रमातील वृद्धांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
“काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था” या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजू पाडेकर, उपाध्यक्ष मा.प्रांजली काळबेंडे मॅडम, कार्याध्यक्ष मा.निरज आत्राम सर, यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवलेला हा कार्यक्रम हर्षोल्लित वातावरणात संपन्न झाला.
यावेळी काव्यांगण बहुउद्देशीय संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष राजू पाडेकर (अहमदनगर), केंद्रीय महिला आघाडी प्रमुख वीणाताई व्होरा (पंढरपूर), जिल्हाध्यक्ष एल. एम. जाधव, जिल्हा कार्याध्यक्षा महानंदा ताई बागेवाडी ( सोलापूर ) जिल्हा सचिव हर्षदा गुळमिरे ( सांगोला ), जिल्हा सहसचिव सुवर्णा तेली (सांगोला) तालुका पदाधिकारी शांताराम गाजरे (पंढरपूर), तालुका पदाधिकारी संजय सांगोलकर (करकंब), तालुका अध्यक्ष करिश्मा डोंगरे(पंढरपूर), तालुका पदाधिकारी प्रिया कौलवार ( पंढरपूर ) तालुका पदाधिकारी विजय लोंढे ( पंढरपूर ) तसेच मातोश्री वृद्धाश्रम चे संचालक धनंजय राक्षे इत्यादी उपस्थित होते.
सुरुवातीस सर्वांना अल्पोपाहार दिल्यानंतर थोड्या वेळाने सर्व वृद्धांचे औक्षण करुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान पाहून प्रत्यक्ष रुख्मिणी – पांडुरंग मिळाल्या सारखे वाटले. या आगळ्या वेगळ्या स्वागताने सारेच भारावून गेले. आपल्याच परिवारातील लोक भेटल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. जवळपास ६० जण यावेळी उपस्थित होते.
त्यानंतर श्री पांडुरंग व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काव्यांगण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृध्दाश्रमाला मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन व्यवस्थापक धनंजय राक्षे यांचा यथोचित सन्मान काव्यांगणचे अध्यक्ष राजू पाडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर सर्व पदाधिका-यांचे सत्कार करण्यात आले.
यानंतर कविसंमेलनाला सुरुवात करण्यात आली. सुवर्णा तेली यांनी छानसा ‘जोगवा’ सादर केला. कवी संजय सांगोलकर यांनी नातेसंबंधावर आपली रचना सादर केली. कवयित्री करिश्मा डोंगरे, महानंदाताई बागेवाडी, प्रिया कौलवार, शांताराम गाजरे यांनीही आपल्या सुंदर रचना सादर केल्या. या कविता ऐकून तेथे उपस्थित असणा-या वृद्धांनाही आपणही काहीतरी सादर करावे, एखादे गाणे गावे, अभंग, कविता म्हणावी असे वाटू लागल्याने त्यांनाही संधी देऊन त्यांची गाणी, जुन्या कविता ऐकण्याचा योग आला. एवढ्या मोठ्या वयातही त्यांनी भारदस्त आवाजात सादर केलेल्या रचनांनी वातावरण आनंददायी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी कवी एल. एम. जाधव यांनी ‘तिरंगा ‘ ही देशभक्तिपर रचना व वीणा व्होरा यांनी माणुसकीचे नाते या आशयाची सुंदर रचना सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सांगोलकर तर सूत्रसंचालन वीणाताई व्होरा आणि आभार शांताराम गाजरे यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम