ब्रिटननंतर आता इटलीत मोठा राजकीय भूकंप, पंतप्रधान द्राघींचा राजीनामा

0
17

दिल्ली – इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत सत्तेत असणाऱ्या युतीमधील पक्षांनी विश्वासदर्शक ठरावात साथ न दिल्याने द्राघी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मट्टरेल्ला यांनी द्राघी यांचा राजीनामा नाकारत, द्राघी यांनी संसदेला संबोधित करत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

मारियो द्राघी यांच्या पक्षासोबतच्या युतीतील दुसरा पक्ष असणाऱ्या फाईव्ह स्टार मुव्हमेंट पक्षाने विश्वासदर्शक ठरावात मतदान करणे टाळल्याने मारियो द्राघी यांनी औपचारिकपणे पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. द्राघी यांच्या सरकारविरोधात संसदेत वाढत्या महागाईवरून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी मारियो द्राघी यांच्या पक्षासोबतच्या युतीमध्ये असणाऱ्या फाईव्ह स्टार मुव्हमेंट पक्षाने विश्वास दर्शक ठरावासाठीच्या मतदानावर बहिष्कार टाकला.

द्राघी २०२१ पासून इटलीचे पंतप्रधान

द्राघी यांच्या युतीतील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेला फाईव्ह स्टार मुव्हमेंट पक्षाने विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकल्याने द्राघी यांचे सरकार अडचणीत आले. त्यानंतर द्राघी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. द्राघी २०२१ पासून इटलीच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत. सरकारी वृतसंस्थेनुसार, द्राघी यांनी म्हटलं की, ‘मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर करतो.’

‘एकता नसलेल्या सरकारचं नेतृत्त्व करु शकत नाही’

विश्वासदर्शक ठरावाकडे युतीतील पक्षाने पाठ फिरवल्याने द्राघी यांचे सरकार धोक्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, ‘संसदेत झालेलं मतदान फार महत्त्वाचं होतं. विश्वासदर्शक ठरावात सरकारच्या बाजूने १७२ तर विरोधात ३९ मते पडली. सरकार तर वाचलं. पण युतीतील पक्षाने मतदानावरच बहिष्कार टाकल्याने एकता नसलेल्या सरकारचं नेतृत्त्व करु शकत नाही’, अशी भूमिका द्राघी यांनी घेत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

याआधी ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन ह्यांना आपल्याच पक्षातील बंडाळीमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. सध्या मूळ भारतीय ऋषी सनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here