मुंबई: राज्यात शिवसेनेतील फुटीने दोन पक्ष तयार झाले असून या राजकारणात सर्वसामान्य पूर्णतः होरपळला आहे. सेनेचे नाव अन् धनुष्यबाण गोठवत दोन्ही गटांना नवीन नाव व चिन्हं देण्यात आले आहे. यात निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला ‘तलवार आणि ढाल’ हे चिन्ह दिले आहे. शिंदे गटाला आदल्या दिवशी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले. शिवसेनेचेधनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना त्यांच्या गटासाठी नाव आणि चिन्हाचा पर्याय देण्यास सांगितले होते.
निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्हाचे वाटप केले आणि त्यांना ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव दिले. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले, मात्र चिन्ह वाटप झाले नाही. आयोगाने शिंदे कॅम्पला चिन्हासाठी नवीन पर्याय देण्यास सांगितले होते
एकनाथ शिंदे गटाने मंगळवारी सकाळी पक्षाच्या चिन्हासाठी तीन पर्यायांची यादी भारताच्या निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे सादर केली. ज्यामध्ये सूर्य, तलवार ढाल आणि पिंपळाच्या झाडाच्या निवडी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने त्यांना तलवार आणि ढाल हे चिन्ह दिले आहे.
निवडणूक आयोगाने नाव जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काल ट्विट केले होते की, “अखेर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या आदर्शांचा विजय झाला. आम्ही त्यांच्या आदर्शांचे वारसदार आहोत.” विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. यानंतर दोन्ही गटांना पक्षासाठी नवीन नावे आणि चिन्ह देण्यास सांगण्यात आले. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम