राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : काही दिवसांपूर्वीच झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते यातून शेतकरी स्वतःला सावरण्यासाठी कसा बसा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तोच मधेच पुन्हा अचानक अस्मानी संकट हे सातत्याने शेतकऱ्यांच्या उरावर चालून येत आहे.यामुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे हवालदिल झाला सध्या कांद्याला भाव नाही कोणत्याही शेतमालाला योग्य भाव नाही असे असताना त्यात अस्मानी संकट चालून येत आहे ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे.
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात रावीवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात गारपीठ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला बागायती पिके,काढणीला आलेला गहू,हरभरा,मका,टोमॅटो यांसह जनावरांचा चारा यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर विटभट्ट्या भिजल्यामुळे मालकांसह कामगारांचेही मोठे हाल झाले आहेत. सायंकाळच्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागातील साकुर फाटा, शेनीत, धामणगाव, भरविर खुर्द, अडसरे खुर्द, बेलगाव, धामणी, तातळेवाडी, पिंपळगाव मोर, टाकेद परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपिटीचा पाऊस झाला असून या नुकसान कारक पावसाबरोबर काही काळ या भागात वीज पुरवठाही काही काळ खंडित झाल्याने या भागातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. या जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अडसरे खुर्द येथील शेतकरी बाळू लक्ष्मण साबळे यांच्या घराचे छत पूर्णपणे उडून गेले.
लोखंडी चायनल वाकून, घराची पूर्ण पत्रे फुटली व गुरेवासरांची पडवी देखील उघडी पडल्याने झोळीत असलेले अकरा दिवसांचे तान्हुले बाळ देखील उघडे पडले सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी साबळे कुटुंबाने एक रात्र पावसात कसाबसा आधार घेत काढली यात त्यांचे घरातील धान्यासह मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची स्थानिक सरपंच, पोलीस पाटील,ग्रामसेवका उषा राठोड यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली आहे.तर भंडारदरावाडी येथील शेतकरी दगडू सखाराम साबळे यांचे घराचे पूर्ण छत उडून गेले यात त्यांचे पूर्णतः नुकसान झाले.तरी या नुकसानीची त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी सर्वत्र परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
“इगतपुरीच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसामुळे गारपिटीने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक तलाठी,ग्रामसेवक यांना देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई साठी अहवाल पाठविला जाणार आहे.”
– परमेश्वर कासुळे ,तहसीलदार इगतपुरी
“रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार चक्री वादळी वाऱ्यासह गारपिटीने अचानक एकाकी घराचे पत्रे छत पूर्णपणे उडून गेले यात सर्व कुटुंब उघड्यावर पडले लहानग्या बाळासह कसे बसे जीव वाचवत आसरा निवारा घेत रात्र काढली.घर सावरण्यासाठी झालेल्या नुकसानीची शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी.
-सुनीता बाळू साबळे
“रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे घराचे पूर्णपणे लोखंडी पत्र्याचे छत उडून गेले यात घरातील जीवनावश्यक वस्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे.”
– दगडू सखाराम साबळे नुकसानग्रस्त शेतकरी भंडारदरावाडी
“मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे वीट भट्टी कच्चा माल याचे मोठे नुकसान झाले होते यातून कसा बसा सवरतोय तोच अचानक काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे वीट भट्टीचे पूर्णतः नुकसान झाले असून सर्व मेहनतीवर पाणी फिरले आहे.”
– रामनाथ जाधव ,वीट भट्टी व्यवसायिक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम