देवळा : समूह शेती व प्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून शेती केल्यास शेतकऱ्यांसाठी ते लाभदायी ठरेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी मूल्यसाखळी सक्षम करण्याचे असे प्रयत्न व्हायला हवेत असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले.
येथील कि-व्हिजन अँग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. अंतर्गत शुक्रवार (दि.७) रोजी कांदा प्रतवारी, साठवणूक व खरेदी विक्री व्यवस्थेसाठी जागेच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आयोजित खुंटेवाडी ता.देवळा येथील कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे उपाध्यक्ष जितेंद्र आहेर यांनी केले.
Tiger hunting : आणि त्यांनी करंट लावून केली वाघाची शिकार..
अडीच हजार मेट्रिक टन कांदा साठवणूक, प्रतवारी आणि खरेदी-विक्रीच्या या जागेचे भूमिपूजन महास्वराज्य फार्मर्स प्रोड्युसर कंपनी (फेडरेशन) चे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री.आहेर म्हणाले की, नवनवीन बाजारपेठांशी जोडले जाणे, बाजारपेठा सशक्त करणे, प्रक्रिया उद्योगांची निर्मिती करणे, कृषी व्यवसायांच्या उभारणीस बळकटी देण्यासाठी अशा संघटनात्मक चळवळींची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी ते ग्राहक अशी साखळी निर्माण करायला हवी.
नाशिक विभागाचे विभागीय अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी सुनील वानखेडे यांनीही बाजारपेठांच्या संपर्क वाढीसाठी शेतकऱ्यांच्या संस्थांना सहाय्य करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी विभाग नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगितले. याशिवाय त्यांनी कांदा पिकाबाबत व त्यावरील प्रक्रिया उद्योगबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक पगार, कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, सरपंच ठगुबाई पवार, स्वप्नील ऍग्रोचे अरुण पवार, कौतिक पवार, स्मार्टचे नोडल अधिकारी जितेंद्र शहा, कृषी व्यवसायक सल्लागार वरुण पाटील, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर अकोले, बँक ऑफ बडौदाचे शाखाधिकारी तुषार सोनवणे, देवळ्याचे उपनगराध्यक्ष अशोक आहेर, नगरसेवक संभाजी आहेर, मनोज आहेर, अतुल पवार, कैलास पवार, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर, देमकोचे व्हा.चेअरमन डॉ.प्रशांत निकम, देवळा ऍग्रोचे प्रवीण मेधने, सोसायटीचेचेअरमन शिवाजीराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कि-व्हिजन कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब पगार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पुढील काळात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. कंपनीचे संचालक राजीव पगार, सम्राट वाघ, जयेश शिंदे, व्यवस्थापक राहुल आहेर यांनी संयोजन केले व आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम