देवळा : देवळा तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज रविवार (दि.१८) रोजी ७९.८८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान विठेवाडी (९२.५३) या ग्रामपंचायतीचे तर सर्वात कमी मतदान दहिवड (६०.३४ टक्के) येथे झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
देवळा तालुक्यातील एकूण १३ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लागला होता. त्यातील मटाणे व भऊर येथील थेट सरपंचपद बिनविरोध झाल्याने इतर ११ गावांच्या सरपंचपदासाठी ३० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले होते, तर फुलेनगर येथील सर्व सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याने उरलेल्या १२ गावांच्या ७७ सदस्यांसाठी १६१ उमेदवार उभे होते.
विठेवाडी व कनकापूर या गावांमध्ये कुणाचीच बिनविरोध निवड न झाल्याने येथे सर्व जागांसाठी मतदान झाले. त्यामुळे या दोन्ही गावांत कमालीची चुरस दिसून आली. विठेवाडी येथे २४९२ पैकी २३०६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तब्बल ९२.५३ टक्के मतदान झाले.
मतदान शांततेत पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद
तालुक्यातील अतीशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत साह्यक पोलिस निरीक्षक पुरोषात्तम शिरसाठ यांच्या टीमने अतिशय उत्तम नियोजन करत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामुळे नागरिकांनी पोलिस प्रशासनाने कौतुक केले आहे. किरकोळ अपवाद वगळता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मतदान पार पडले कार्यकर्त्यांना तसेच उमेदवारांना पोलिसांनी सुरवातीलाच इशारा देत गैरवर्तन केल्यास परिणाम भोगावे लागतील असे सूचित केले होते. यामुळे शिरसाठ व त्यांच्या चमूने उत्तम बंदोबस्त ठेवला होता.
इतर गावात झालेले मतदान व टक्केवारी पुढीलप्रमाणे:
डोंगरगाव – २३५१ पैकी २००७ (८५.३६ टक्के)
दहिवड – ५०२६ पैकी ३०३३ (६०.३४ टक्के)
वासोळं – २३२० पैकी १८८७ (८१.३३ टक्के)
सटवाईवाडी – १७०५ पैकी १४८१ (८६.८६ टक्के)
भऊर- २९२३ पैकी २४०४ ( ८२.२४ टक्के)
कणकापूर – १४७० पैकी १२६८ (८६.२५)
वाजगाव – २७७२ पैकी २३०५ (८३.१५)
चिंचवे – २१७५ पैकी १८७६ (८६.२५)
फुलेनगर – ७९२ पैकी ६८९ (८७ टक्के)
मटाणे – ३४५ पैकी २४६ (७१.३०)
श्रीरामपूर – १६४३ पैकी १४७९ (९०.०१)
खामखेडा – २८५६ पैकी २३९६ ( ८३.९७)
याप्रमाणे अशी माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी , निवासी नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्रे, आकडेवारी व इतर माहिती संकलित करण्याचे काम सुरू होते. मंगळवार (दि.२०) रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम