
देवळा : देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज गुरुवार (दि.४) रोजी सरासरी ८६.०९ टक्के मतदान झाले. टक्केवारीनुसार सर्वाधिक मतदान सुभाषनगर ग्रामपंचायतीसाठी ९८.९५ टक्के झाले, तर सर्वात कमी मतदान वाखारी येथे ८१.०२ टक्के झाले.

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या ८२ जागांसाठीच्या १७१ उमेदवारांचे भवितव्य इ.व्ही.एम. मशीन मध्ये बंद झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून उद्या सकाळी १० वाजता नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होणार आहे अशी माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली. तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला . सुरुवातीपासून मतदानाचा उत्साह दिसून आला. सुटीचा दिवस नसल्याने दुपारी काही वेळ मतदान केंद्रांवर शांतता असली तरी पुन्हा साडेतीननंतर मतदानप्रक्रियेस गती आल्याचे दिसून आले.
ग्रामपंचायतनिहाय झालेले मतदान असे, पिंपळगाव ( ८३.२६ टक्के ), खुंटेवाडी ( ८२.०८ टक्के ), सावकी ( ८८.१३ टक्के ), गुंजाळनगर ( ८८.८७ टक्के ), वाखारी ( ८१.०२ टक्के ), खर्डे ( ८४.८३ टक्के ), खडकतळे ( ९०.६५ टक्के ), शेरी ( ८८.२२ टक्के ), वार्शी ( ८७.०६ टक्के). विजयनगर ९०.८८, सुभाषनगर ९८.९५ %, कापशी ८९.९७ %, रामेश्वर ८३.३८ %, याप्रमाणे आहे. सर्व ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
सकाळी १० वाजता वाजगाव रस्त्यावरील नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. यात सर्वसाधारण जागांसाठी अधिक रस्सीखेच दिसून आली. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही . पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
यापूर्वीच या १३ ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींच्या ४१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र खुंटेवाडी, खर्डे, खडकतळे व गुंजाळनगर या गावांमध्ये सर्व जागांसाठी निवडणूक लागल्याने येथे मतदानासाठी रस्सीखेच पहावयास मिळाली. तर सावकी येथे १० जागांसाठी, पिंपळगाव येथे सहा, शेरी चार, वार्षी पाच, रामेश्वर दोन, कापशी सात, विजयनगर तीन तसेच वाखारी येथेही चार जागांसाठी समोरासमोर लढत झाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम