
देवळा : फुलेमाळवाडी ता. देवळा येथील गट नंबर ६६ मिळकती बाबत विविध न्यायालयात प्रलंबित दाव्यांचा अंतिम निकाल पारित होत नाही तोपर्यंत सदर मिळकतीचे ७-१२ वर कोणत्याही प्रकारचे फेरफार नोंदवू नये असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी लेखी आश्वासन दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून फुलेमाळवाडी येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आज शनिवार (ता.२८) रोजी सायंकाळी मागे घेण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फुलेमाळवाडी येथील गट नं.६६ या भोगवटदार वर्ग -२ जमिन ही प्रतिबंधीत जमिन खुला करून जमिन खरेदी विक्री केलेली आहे. याबाबत तक्रार प्राप्त झालेली असून यासंदर्भात सदर शेतकऱ्यांनी जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर दि २६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले होते. याची प्रशासनाने दखल घेतली असून उपविभागीय अधिकारी चांदवड यांचेकडे नोंद नं.१२२१ बाबत व कोर्टातही केस सुरु आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने मौजे फुलेमाळवाडी ता.देवळा येथील गट नंबर ६६ मिळकती बाबत विविध न्यायालयात प्रलंबित दाव्यांचा अंतिम निकाल पारित होत नाही तोपर्यंत सदर मिळकतीचे ७-१२ वर कोणत्याही प्रकारचे फेरफार नोंदवू नये असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी लेखी आश्वासन शनिवार (दि.२८ ) रोजी सायंकाळी उशिरा दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून माळवाडी येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव उपस्थित होते.
जमीनीवरील कब्जेदार कुळांना डावलून परस्पर जमीन खरेदी करणाऱ्यांची चौकशी करून न्याय मिळावा याबाबत देवळा येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडून कळविण्यात आले. यामुळे सदर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याने उपोषण सोडण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम