द पॉईंट नाऊ: जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने, तसेच धरणांची क्षमताही संपुष्टात आल्याने वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी जिल्ह्यात साडेचार हजार वनराई बंधारे बांधण्याची तयारी कृषी विभागाने चालविली असून, त्याद्वारे जवळपास सहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
वनराई बंधारे बांधण्यासाठी अंदाजे सात ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत असून, पावसाळ्यानंतरचा सुरू असलेला पाण्याचा प्रवाह विचारात घेऊन सर्वसाधारणपणे प्रवाह बंद होण्यापूर्वी पाणी अडविण्याचे काम करणे आवश्यक आहे. यासाठी पाणलोट क्षेत्र व क्षेत्राच्या बाहेरची तांत्रिक निकष विचारात घेऊन जागेची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी नाल्याची पाहणी करून कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त पाण्याचा साठा करणे कसे शक्य होईल, या दृष्टीने जागा निवडावी. त्याचप्रमाणे, नाला अरुंद व खोल असावा, साठवण क्षमता पुरेशी असावी, नाल्याच्या तळाचा उतार सर्वसाधारणपणे २ ते ३ टक्के खोल असावा. वनराई बंधाऱ्याची उंची दीड मीटरपेक्षा नसावी. ज्या गावांत पाणलोट विकासाची कामे सुरू नाहीत, अशा गावात वनराई बंधारा बांधल्यास पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दिलासा मिळणार आहे.
वनराई बंधारे बांधण्यासाठी जिल्ह्यात ४ हजार ५७० बंधारे बांधण्यात येणार असून त्यामुळे सहा हजार अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्या अनुषंगाने बंधारा बांधण्यासाठी तांत्रिक बाबी व निकषांची माहिती जाणून घेण्यासाठी नजीकच्या तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
असा होणार पाण्याचा वापर
या वर्षात पुरेशा प्रमाणावर पाऊस झाल्याने, सिंचन व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरणार आहेत. यामध्ये पाण्याचा प्रवाह पारंपरिक पद्धतीने अडवून त्यात पाण्याचा साठा केला जाईल.
बिगर पावसाळी हंगामातील पिकांसाठी पाण्याची गरज भागवता येणार आहे. यासाठी सिमेंट, खतांची रिकामी पोती, माती व वाळू इत्यादी साधनसामग्रीचा वापर करून, वनराई बंधाच्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बांध तयार करण्यात येईल. या वनराई बंधाऱ्याने स्थानिक नागरिकांना दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध होण्याबरोबरच आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन, या साठ्यामधून पाण्याचा उपसा करून उन्हाळी हंगामातील पिके घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम