दिल्ली – नॉटिंगहॅम येथे झालेल्या भारत वि. इंग्लंड अखेरचा टी२० सामना यजमान इंग्लंडने १७ धावांनी जिंकली. भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकत आपल्या नावावर केली.
यजमानांनी भारताला विजयासाठी २१६ धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ऋषभ पंत, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे स्वस्तात बाद झाले. यानंतर मात्र, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला. अय्यरने २३ चेंडूत २८ धावा केल्या.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने अवघ्या ४८ चेंडूत शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा भारतीय ठरला आहे. सूर्यकुमारने ५५ चेंडूत १४ चौकार आणि ६ षटकार ठोकत ११७ धावांची अप्रतिम खेळी केली. मात्र भारताला निर्धारित २० षटकांमध्ये ९ गडी गमावून १९८ धावा करता आल्या. इंग्लंडच्या रिसी टॉफलेने २२ धावा देत ३ गडी घेतल्या.
तत्पूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने २० षटकांमध्ये सात गड्यांच्या बदल्यात २१५ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद ४२ धावा तर डेव्हिड मलानने ७७ धावा केल्या. भारताच्या हर्षल पटेल व रवी बिष्णोईने २-२ गडी बाद केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम