मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. एकनाथ खडसे यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा ताबा तातडीने सोडण्याचे आदेश ईडीने दिले होते. या विरोधात खडसेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर हायकोर्टाने खडसेंच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. एकनाथ खडसेंचे वकील मोहन टेकवडे यांनी ईडीला पत्र लिहून दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या आदेशाबद्दल माहिती दिली आहे.
ईडीने गेल्या आठवड्यात एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली होती. यात दहा दिवसांमध्ये जप्त केलेल्या सर्व मालमत्ता शांततेत रिकाम्या करा, असे ईडीकडून बजावण्यात आले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यातंर्गत 25 ऑगस्ट 2021 रोजी एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, इन्सिया मुर्तझा बदलावाला आणि उकानी यांच्या वैयक्तिक तसेच संयुक्त मालकीच्या 11 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या होत्या.
या मालमत्तांचा आहे समावेश
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने एकनाथ खडसे यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. या मालमत्तेचे एकूण मूल्य 5 कोटी 75 लाख इतके आहे. यामध्ये लोणावळ्यातील बंगला, जळगावमधील 3 फ्लॅट आणि 3 मोकळ्या भूखंडांचा समावेश आहे. ही मालमत्ता 10 दिवसांत खाली करावी, असे ईडीच्या नोटीसमध्ये म्हटले होते. या नोटीशीच्या विरोधात एकनाथ खडसे यांनी दिल्ली येथील हायकोर्टात धाव घेतली होती. येथे या प्रकरणावर आज सुनावणी झाली. यात कोर्टाने ईडीच्या या कारवाईला स्थगिती दिली. यामुळे खडसे यांना दिलासा मिळाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम