मुंबई: राज्यात भूकंप घडवणारे बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली असून राउत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून भाजपावर हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्रावर वार’ या मथळ्याखाली आजचा जहरी अग्रलेख लिहिण्यात आला असून यात भाजपवर टीका करण्यात आली आहे. भाजप एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून ऑपरेशन कमळ घडवत आहे, असं या लेखात लीहले आहे. धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करेल काय? असा सणसीत सवाल देखील सामनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सरकारचे काय होणार हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? असा तिखट सवाल लेखात केला गेला आहे.
लेखात म्हटलं आहे की, संकटांशी आणि वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय असून गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच आणि तेव्हा घायाळ होणार असं लेखात म्हटलं आहे.
शिवसेनेच्या आमदारांना ‘उचलून’ गुजरातला नेण्यात आले
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील सरकारला खेचण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचे प्रकरण पहाटे झाले. त्यात यश आले नाही. मात्र आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून ‘ऑपरेशन कमळ’ घडवतात. काही करून राज्यातील सरकार घालवायचे याच ईर्षेने त्यांना झपाटलेले आहे. राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपने कोणत्या छुप्या कारवायांमुळे जिंकली याचा उलगडा आता होत असून विधान परिषदेत भाजपास दहावी जागा जिंकण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांनीच राज्यसभेत भाजपचा धनदांडगा उमेदवार विजयी केला आणि संजय पवार या शिवसैनिकाचा पराभव घडवून आणला हे दुर्दैवी आहे, सोमवारी विधान परिषदेत दहावी जागा जिंकताच शिवसेनेच्या दहाएक आमदारांना ‘उचलून’ गुजरातला नेण्यात आले. त्यांच्या भोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
यातील दोन-चार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण केली आहे, अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना तर इतकी मारहाण झाली की त्यांना हृदयविकाराचा झटका आला व इस्पितळात दाखल करावे लागले. कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सटकले आणि भर पावसात चालत रस्त्यावर येऊन कसेबसे मुंबईस पोहोचले. अशाप्रकारे चार-पाच आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक करून ‘ऑपरेशन कमळ’वाल्यांच्या ताब्यात दिले. हा काय प्रकार आहे? अशाने लोकशाहीची काय इभ्रत राहणार आहे? असा सवाल लेखात करण्यात आला आहे.
केंद्रीय सत्तेचा माज दाखवून महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण
लेखात पुढं म्हटलं आहे की, विधान परिषदेतील दहाव्या जागेचा विजय भाजपने मिळवला तो शिवसेनेतील तथाकथित निष्ठावंत वगैरे म्हणवून घेणाऱ्या लोकांना बेइमान करून. या निवडणुकीत काँगेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पाडून भाजपने विजय मिळवला. हंडोरे हे मुंबईतील दीन-दलित समाजाचे नेते आहेत. अशा दीन-दलितास पाडून भाजपने बेइमानांच्या मतांवर विजयोत्सव साजरा केला. त्याच बेइमानांना लगेच गुजरातच्या भूमीवर नेऊन जोरदार सरबराई सुरू झाली. शिवसेनेचे दोन उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी विजयी झाले, पण त्यांच्या अधिकृत मतांतही घाटा दिसत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार जिंकले, पण मतांची फाटाफूट घडवून भाजपने जो पाचवा विजय मिळवला ती कपटनीती म्हणजे भाजपचा खरा चेहरा आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी एका तळमळीने भाष्य केले. महाराष्ट्रात सत्तेचा माज चालणार नाही. केंद्रीय सत्तेचा माज दाखवून महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आईचे दूधविकणारी अवलाद शिवसेनेत नको, असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणत. असे लोक शिवसेनेत निर्माण व्हावेत ही महाराष्ट्राच्या मातीशी बेइमानीच आहे. शिवसेना ही आई. तिच्या आणा-भाका घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आईच्या दुधाचा बाजार मांडला. त्या बाजारासाठी जागा निवडावी सुरतची. हा योगायोग समजायचा काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती व त्याच सुरतमधून आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयोग सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात महाराष्ट्राचे ठाकरे सरकार खुपत आहे, त्यापेक्षा जास्त शिवसेना खुपत आहे. त्यामुळे आधी शिवसेनेवर वार करा व मग महाराष्ट्रावर घाव घाला, असे राजकारण स्पष्ट दिसते. मध्य प्रदेश व राजस्थानात ज्या प्रकारे फोडाफोडीचे राजकारण करून सरकारे पाडली तोच ‘पॅटर्न’ महाराष्ट्रात वापरायचा व स्वतःला ‘किंग मेकर’ म्हणून ओवाळून घ्यायचे असे तीन अंकी नाटक सुरू झाले आहे. ‘विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेले मतदान व मतांची फाटाफूट ही तर सुरुवात आहे. आता आम्ही मुंबई जिंकू. मुंबईवर ताबा मिळवू,’ अशी भाषा मंगलप्रभात लोढा यांनी केली, यातच सगळे आले. मुंबईवर ताबा मिळवायचा असेल तर शिवसेना डळमळीत करा, हेच महाराष्ट्रद्रोह्यांचे धोरण आहे. स्वतःला ‘मावळे’ म्हणवून घेणारे त्या महाराष्ट्रद्रोह्यांच्या कपट-कारस्थानाचे भागीदार होणार असतील तर शिवराय त्यांना माफ करणार नाहीत, असं लेखात म्हटलं आहे.
भाजपाने सत्तेच्या राजकारणासाठी लाजच सोडली
लेखात पुढं म्हटलं आहे की, महाराष्ट्र हे शहाण्यांचे राज्य आहे. शहाणपणाच्या बाबतीत महाराष्ट्र इतरांच्या बाबतीत दोन पावले पुढेच असेल. इतर प्रांतात व कळपांत दीडशहाणे असतील तर महाराष्ट्रात साडेतीन शहाणे असतात. दुसरे असे की, महाराष्ट्रास वेगात व वेडात दौडणाऱ्या ‘सात’ वीरांचा इतिहास आहे. पण ते सात वीर वेडात व वेगात दौडले ते स्वराज्यासाठी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नाही. म्हणूनच त्या वीरांना आजही मानवंदना दिली जाते. राजकारण हे वाईट नाही, पण सत्तेची अति महत्त्वाकांक्षा हे जालीम विष ठरते. शिवसेनेने ‘आई-बाप’ बनून असंख्य फाटक्या लोकांना जे दिले ते इतर पक्षांत भल्याभल्या वतनदारांना मिळवता आले नाही. शिवसेनेसाठी छातीचा कोट करून जो मावळा उभा राहिला त्याच्या त्यागातून भगवा झेंडा डौलाने फडकत राहिला. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी माती खाल्ली त्यांना महाराष्ट्राची माती व शिवसैनिक माफ करणार नाहीत. भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या राजकारणासाठी लाजच सोडली. एखाद्या राज्यात सत्ता मिळवता आली नाही म्हणून ते राज्य अस्थिर आणि डळमळीत करायचे, हेच त्यांचे धोरण आहे. माणसे फोडायची, फितुरीची बिजे रोवायची, त्या फितुरीचे पिक खडकावरही काढण्यात हे लोक पटाईत, पण देशातील बेरोजगार ‘अग्निवीर’ रस्त्यावर उतरला आहे, कश्मीरात हिंदूंचे हत्याकांड सुरू आहे. लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही योजना व धमक त्यांच्यात दिसत नाही. फितूर निर्माण करायचे व त्या जोरावरच राज्य आणायचे. हीच यांची ‘किंग मेकर्स’ कंपनी. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने तेव्हा हेच केले. ही ईस्ट इंडिया कंपनीही शेवटी गाशा गुंडाळून निघून गेली. विधान परिषद निकालाने त्या ईस्ट इंडिया कंपनीचा आत्मा महाराष्ट्रात फडफडताना दिसला. बरे झाले, या निमित्ताने महाराष्ट्र जागा झाला. महाराष्ट्र जागा झाला की पेटून उठतो, हा इतिहास ईस्ट इंडिया कंपनीच्या फितूर मंडळाने लक्षात घ्यावा, असं लेखात म्हटलंय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम