दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून घरातील पाळीव कुत्रे माणसांवर विशेषतः लहान मुलांवर हल्ला करण्याच्या घटनेत वाढ होत असून घटनेमुळे अनेक नागरिकांना आपल्या मुलांची चिंता वाटू लागली आहे.
अशीच एक घटना घडली आहे दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये. तिथे एका पिटबूल कुत्र्याने ११ वर्षीय लहान मुलावर हल्ला केला. ज्यामुळे त्या मुलाच्या चेहऱ्यावर तब्बल १५० टाके पडले आहे.
पुष्प त्यागी असे या मुलाचे नाव असून त्याच्यावर पिटबूल कुत्र्याने हल्ला केला. ही घटना ३ सप्टेंबरची असून त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पुष्प आपल्या घराजवळच्या गार्डनमध्ये खेळत होता, त्यावेळी एक मुलगी पिटबूल कुत्र्याला घेऊन गार्डनमध्ये फिरण्यासाठी आली होती. अचानक तो कुत्रा हिंसक झाला आणि मुलीच्या हातातून सुटत तो पुष्पच्या अंगावर धावून गेला आणि त्याच्या चेहऱ्यावर हल्ला केला. घटना पाहताच तिथल्या काही लोकांनी त्या मुलाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले आणि रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यावर तब्बल १५० टाके पडली आहेत.
दरम्यान, संबंधित कुत्र्याच्या मालकावर स्थानिक नगरपालिकेने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्या मालकाने आपल्या पिटबूल कुत्र्याचे रजिस्ट्रेशन न करताच त्याला घरात ठेवले असल्याचे समोर आले आहे. याच शहरात दोन दिवसांपूर्वी एका पाळीव कुत्र्याने लिफ्टमध्ये चिमुरड्याचा चावा घेतला होता, हे विशेष. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर कुत्र्याच्या मालकिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून त्यांनी आपल्या मुलांना बाहेर एकटे पाठवण्याची भीतीही बोलून दाखवली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम