राज्यातील दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शासनाकडून आता “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानामुळे विविध योजनांचा लाभ दिव्यांगांना एकाच छताखाली मिळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून समितीच्या नियंत्रणाखाली या शिबिराच आयोजन करण्यात येईल. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे या समितीचे सदस्य सचिव राहणार आहे तर आमदार बच्चू कडू हे या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक राहणार आहेत.
दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांगांचा समावेश होतो. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाही यामुळे शासनानेच दिव्यांगाना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी हा पर्याय निवडला आहे. विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा तसेच त्यांना विविध प्रश्नांची सोडवणूक करता यासाठी “दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी” हे अभियान राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील जवळपास 29 लाख लोकसंख्या असलेल्या दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात जवळपास 29 लाख 63 हजार 392 दिव्यांगांची संख्या असून त्यापैकी केवळ नऊ लाख दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र प्राप्त झालं असल्याची माहिती समोर आली आहे. तर उर्वरित दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र नसल्याने अनेक योजनांच्या लाभापासून वंचित राहावं लागत आहे. यामुळे या शिबिराच्या माध्यमातून वैश्विक ओळखपत्र देण्याच्या कार्यक्रमाला देखील गती मिळणार आहे.
याचबरोबर शेती संबंधित कागदपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच इतर अन्य अत्यावश्यक दस्ताऐवज मिळवण्यासाठी देखील या शिबिरामुळे मोठी मदत मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनांमधून तसेच सामाजिक संस्थांच्या सीएसआर मधून उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणारे उपकरण देखील या शिबिरांच्या माध्यमातून वाटप करण्यात येतील. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून बच्चू कडू यांची मुख्य मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ७ जून पासून या अभियान सुरुवात करण्यात आली. या अभियानाचं पहिलं शिबिर हे मुंबईमध्ये घेण्यात आलं तर इतर जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईतील साडेतीन हजार दिव्यांगांनी घेतला शिबिराचा लाभ.
“दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” या उपक्रमाची सुरुवात ७ जूनला मुंबई येथून करण्यात आली मुंबई शहर व उपनगर तसेच जिल्ह्यातील ३५०० दिव्यांग व्यक्तींनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता. या ठिकाणी ५९ विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. विविध ९० शासकीय सुविधांची, योजनांची माहिती तसेच अर्ज या स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आले होते अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम