Skip to content

मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर अखेर दीपाली सय्यद याचं ठरलं ?


मुंबई : एखादे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर आपल्याला आपला नेता सपोर्ट करत असेल, तर मला वाटतं, आपण त्यांच्याबरोबर जायला हवं, असे दीपाली सय्यद यांनी करत शिंदे गटात जाण्याचे सूचक संदेश दिले आहे.

शनिवारी संध्याकाळी अभिनेत्री व शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. सय्यद व मुख्यमंत्री यांच्यात दीड ते दोन तास चर्चा झाली असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. भेटीनंतर त्या बंगल्याबाहेर दाखल झाल्या व प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी गेल्या काही दिवसांपासून त्याच्याबद्दल होत असलेल्या सर्व चर्चांवर अखेर मौन सोडले आहे. त्या म्हणाल्या, की काही गोष्टींसाठी नियोजन आखावे लागते, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मागील काही दिवसांपासून मी त्याच कामात होते, लवकरच ते लोकांपर्यंत पोहोचेल. तसेच उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी प्रत्येकजण आपापले काम करतो, असे म्हणत माझी कोणावरही नाराजी नाही. प्रत्येकजण आपली जागा स्वत:च्या कर्तृत्वाने मिळवत असतो. त्यामुळे मी नाराज नाही, असे सय्यद यांनी स्पष्ट केले. पण मी अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटायला प्रयत्न केला होता. मात्र माझा आवाज मातोश्रीतील त्यांच्या जवळच्या काही लोकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाही, माझा आवाज दबू दिला, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

तसेच त्या असेही म्हणाल्या, मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. हे दोन्ही नेते एकत्र यावेत, अशी माझी इच्छा होती. पण भविष्यातही त्यांनी एकत्र यावे, असे मला वाटते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याबद्दल बोलताना त्यांनी ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. पण उद्धव यांनी अगोदरच या दौऱ्यांना सुरुवात करायला हवी होती. कारण माझे पदाधिकारी किती मजबूत आहेत, हे त्या नेत्याने तपासले पाहिजे. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी हे केले असते, तर आज शिवसेनेत फूट पडली नसती, असेही दीपाली सय्याद म्हणाल्या.

आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता हे निश्चित आहे, की दीपाली सय्यद या शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहे. पण कधी सांगतील यावर मात्र त्यांनी बोलणे टाळले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!