Dindori Lok Sabha Result | दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांद्याने बाजी पलटवली. भाजपने ओवर कॉन्फिडन्सच्या भरात बालेकिल्ला हातचा घालवला आणि शरद पवारांच्या पठ्ठयाने मैदान मारले. मात्र, या निवडणुकीत गेम चेंजर ठरला तो ‘कांदा’. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भारती पवारांच्या (Dr Bharti Pawar) विरोधात प्रचंड रोष होता. याचा प्रत्यय त्यांना प्रचारादरम्यान अनेकवेळा आला. मात्र, यावर उपाय म्हणून भाजपचे ‘ब्रॅंड ॲम्बेसेडर’ पंतप्रधान नरेंद्र मोदींना मैदनात उतरवण्यात आले. कारण मोदींचा चेहरा आणि राम मंदिराकडे पाहून लोक मतं करतील. हा भाजपचा अतिआत्मविश्वासच या निवणुकीत त्यांना नडला. (Dindori Lok Sabha Result)
तर, दुसरीकडे भाजपवर नाराजी असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपसुकच दूसरा पर्याय निवडला, तो म्हणजे शरद पवारांचा. भारती पवारांच्या विरोधातील मतदार संघातील आणि पक्षातील अंतर्गत वातावरण यामुळे दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल सुरुवातीपासूनच स्पष्ट दिसत होते. हे कुठेतरी भाजपलाही माहिती होते. त्यामुळेच या जागेवर भाजपसमोर असलेले संकट तारण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरिश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, यंदा तेही या संकटातून भाजपला वाचवण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
Dindori Lok Sabha Election | प्लॅन सक्सेसफूल..?; दिंडोरीत ड्यूप्लिकेट भगरे सरांचीच हवा, लाखाकडे कूच
Dindori Lok Sabha Result | ‘त्या’ तरूणामुळे मोदींची सभा फेल..?
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे कांदा पट्ट्यात ही निवडणूक शेतकऱ्यांनी हातात घेतली होती. त्यामुळे या सर्व मतदार संघात भाजपच्या उमेदवारांना शेतकऱ्यांनी प्रभवांची धूळ चारली. याचाच मोठा फटका भारती पवार यांना बसला. यंदा भाजपने नवा उपाय शोधला, तो म्हणजे जे मतदार संघ धोक्याचे आहेत किंवा जेथे विजय अवघड आहे, अशा ठिकाणी मोदींच्या सभा घेणे. हाच उपाय दिंडोरीतही आजमावण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथील सभा गेमचेंजर ठरेल, असा अतिआत्मविश्वास भारती पवार आणि भाजपच्या नेते मंडळींना होता. मात्र, झाले उलटच, मोदींच्या सभेत किरण सानप या तरुणाने “कांद्यावर बोला”, अशा घोषणा दिल्यानंतर त्यावर मोदींनी “जय श्रीराम”च्या घोषणा दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोदी फक्त धर्माच्या आधारवर मते मागत असल्याचा विरुद्ध संदेश गेला. (Dindori Lok Sabha Result)
दरम्यान, दिंडोरी मतदारसंघात एकूण दहा उमेदवार निवडणुकीत उतरले होते. मात्र, खरी लढत ही भाजपच्या डॉ. भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यातच होती. तर, भास्कर भगरे यांना ५ लाख ७७ हजार ३३९ आणि भारती पवारांना ४ लाख ६४ हजार १४० इतकी मतं मिळाली. यात पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवत भगरे गुरुजींनी १ लाख १३ हजार १९९ मतांनी भारती पवारांचा पराभव केला.
सहा आमदार असूनही अपयशी
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी हॅट्रिक केली होती. मात्र, गेल्या निवडणुकीत चव्हाण यांना डावलून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या भारती पवारांची उमेदवारीसाठी वर्णी लागली. तर, भारती पवारांनीही हा गड राखत भाजपचा बालेकिल्ला अबाधित ठेवला. मात्र, वातावरण विरोधात असल्याचे माहीत असतानाची ओवर कॉन्फिडन्समध्ये पुन्हा त्याच उमेदवारांना संधी दिल्याने भाजपने हा हक्काचा बालेकिल्ला घालवला. (Dindori Lok Sabha Result)
तर, भाजपाचा सलग वीस वर्षापासूनचा बालेकिल्ला जिंकण्यात ८४ वर्षांच्या योद्ध्याला यश आले. या मतदारसंघात दिंडोरीत अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ, कळवणमधून अजित पवार गटाचे आमदार आणि भारती पवारांचे दीर नितीन पवार, निफाडमध्ये अजित पवार गटाचे दिलीप बनकर, चांदवड देवळ्यात भाजपचे राहुल आहेर, नांदगावमध्ये शिंदे गटाचे सुहास कांदे, येवल्यात अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ असे सर्व सहा आमदार हे महायुतीचे असून आणि सर्व ताकद पणाला लावूनही महायुतीला गड राखता आला नाही.
केवळ चार जणांनी भगरेंसाठी खिंड लढवली
तर, भास्कर भगरे यांच्यासाठी येवल्यातून नरेंद्र दराडे, निफाडमधून माजी आमदार अनिल कदम, चांदवडमध्ये माजी आमदार शिरीष कोतवाल यांनीच खिंड लढवली. दिंडोरी लोकसभेची ही निवडणूक कांद्याभोवतीच फिरली आणि साम, दाम, दंड, भेद वापरूनही भारती पवारांचा दारुण पराभव झाला. स्वतःच्या होम ग्राउंड कळवणमध्येही त्यांना आघाडी घेता आली नाही.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सहाही आमदार महायुतीचे असूनही भाजपचा पराभव झाला. तर, विरोधात असलेले शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे नवखे असूनही त्यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.(Dindori Lok Sabha Result)
Dindori Lok Sabha Result | ड्यूप्लिकेट भगरे सरांनी घेतली ओरिजिनल भगरे सरांची मोठी मतं..?
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान
१. नांदगाव (सुहास कांदे- शिवसेना शिंदे गट)
- भास्कर भगरे – 61, 336
- डॉ. भारती पवार- 1, 03,001 (आघाडी)
- बाबु सदू भगरे सर – 12, 288
२. कळवण (नितीन पवार – अजित पवार गट)
- भास्कर भगरे – 1,14,134 (आघाडी)
- डॉ. भारती पवार- 56,461
- बाबु सदू भगरे सर- 20, 843
३. चांदवड – देवळा ( राहुल आहेर- भाजप)
- भास्कर भगरे – 78, 578
- डॉ. भारती पवार – 95, 325 (आघाडी)
- बाबु सदू भगरे सर – 12, 509
४. येवला (छगन भुजबळ- अजित पवार गट)
- भास्कर भगरे – 93, 500 (आघाडी)
- डॉ. भारती पवार- 80, 295
- बाबु सदू भगरे सर- 16, 039
५. निफाड (दिलीप बनकर – अजित पवार गट)
- भास्कर भगरे – 89, 554 (आघाडी)
- डॉ.भारती पवार- 71, 370
- बाबु सदू भगरे सर-14, 414
६. पेठ-दिंडोरी (नरहरी झिरवाळ- अजित पवार गट)
- भास्कर भगरे- 1,38,189 (आघाडी)
- डॉ. भारती पवार – 55,881
- बाबु सदू भगरे सर- 27,442
एकूण मतदान – 12,41,985
नोटा – 8246
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम