सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील तहसीलदारांना बुधवारी (दि.१८) रोजी वहिवाटीच्या केसवरुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला असून, सदर आरोपीच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी कि, देवळा तहसील कार्यालयात बुधवारी (दि.१८) रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास न्यायालयीन कामकाज सुरु असताना चंद्रकांत पुंजाराम पगार (रा.खडकतळे, ता.देवळा) यांनी महिला शिपाईला धक्काबुक्की करून जबरदस्तीने तहसीलदारांच्या दालनात प्रवेश केला आणि तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्याशी वहिवाट केसच्या निकालावरून हुज्जत घालून शासकीय कामकाजात अडथळा आणला.
Deola | शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी नोंदणी करावी; तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांचे आवाहन
बुधवारी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्या उपस्थितीत न्यालयीन कामकाज सुरु असताना कडलग यांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग काढू नये अशी तोंडी सूचना देऊन देखील पगार यांनी दालनात मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग काढली. तसेच तहसीलदारांना आर्वच्य भाषेत शिवीगाळ केली व मी अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेऊन आत्महत्या करून तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून तुम्हाला सर्वांना अडकवून टाकतो अशी धमकी दिली असल्याची फिर्याद नायब तहसीलदार बबन अहिरराव यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३२, १२१ (१), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे पगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
सदर प्रकरण हे अर्ध न्यायिक स्वरूपाचे कामकाज आहे. आरोपी हे तहसीलदार यांच्या न्यायालयात दाखल दोन दाव्यात पक्षकार होते. दोन्ही दाव्यात दोन्ही बाजूंना पुर्ण संधी देऊन गुणवत्तेवर निर्णय देण्यात आला आहे. मात्र त्यातील एक निर्णय सदर आरोपीस मान्य नसल्याचे आरोपीचे म्हणणे होते. त्यावर त्यांना उचित सक्षम न्यायाधिकरणासमोर दाद मागण्याचा पर्याय अवलंबणे बाबत सांगण्यात आले होते. मात्र मुदतीत अपील दाखल करण्याचा कायदेशीर पर्याय न स्वीकारता आरोपीने न्यायाधिकरणावर निकालाची अमंलबजावणी होऊ नये याकरिता अपशब्द वापरून स्वत: जीवाचे बरेवाईट करून घेणे, प्रसंगी खून पडतील अशी भाषा वापरून दबाव आणण्याचा व न्यायालयीन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
– डॉ मिलिंद कुलकर्णी (तहसीलदार, देवळा)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम