देवळा : येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदीरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी कार्यक्रमाची सांगता झाली. यानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी 117 प्रकारची दुर्मिळ कंदमुळे, रानभाज्या,व भाजीपाला एकत्र करून तयार केलेल्या महाप्रसादाचा ११ हजार भाविकांनी लाभ घेतला.
प.पू. गुरू माउली स्वर्गीय शिवानंद महाराज यांच्या प्रेरणेतून २५ वर्षांपूर्वी दुर्गामाता मंदीरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव सुरू करण्यात आल्यानंतर दरवर्षी नियमितपणे साजरा केला जात आहे.कोरोनामुळे दोन वर्ष उत्सव झाला नाही. हया वर्षी शुक्रवार ३० डिसेंबर ते शुक्रवार ६ जानेवारी हया कालावधित हा उत्सव साजरा करण्यात आला.
उत्सव काळात शोभायात्रा, नवचंडीयाग, बालाजी कथा आदी कार्यक्रम झाले. कु. अनुराधा दिदी यांनी उत्सव काळात नित्यनियमाने सायंकाळी साडेसात ते दहा हया वेळेत बालाजी पुराणावर प्रवचन केले. यावेळी बालाजी पुराणातील पात्र आकर्षक वेशभूषा करून सादर करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी प्रवचनाचा लाभ घेतला. शोभायात्रेने उत्सवास प्रारंभ होउन अखेरच्या दिवशी नवचंडी याग, पालखी मिरवणुक काढण्यात आली.
सायंकाळी दिनेशगिरी महाराज यांचे प्रवचनानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी दुर्गामाता मंदीर परीसर पंचक्रोशीतील भाविकांच्या गर्दीमुळे फुलून गेला होता. शाकंभरी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन ग्रामस्थ, व सत्संग सेवा समिती देवळा यांच्या वतीने करण्यात आले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम