अंकुश सोनवणे | देवळा
देवळा तालुका तसा अतिसंवेदनशील नसला तरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. गेल्या काही वर्षात बाईक चोरीच्या घटना वाढल्या आहेत, अवैध धंद्यांवर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई झाली मात्र ती तात्पुरती ठरली वेळोवेळी अवैध धंदे चालकांनी डोके वर काढले, वाळू उपसा देखील महत्वाचा ठरला. अनेकवेळा बेबंदशाही सर्वसामान्य नागरिकांना जाणवली. गेले कित्येक दिवस झाले देवळा पोलिसांची संख्या मात्र तोकडीच आहे. निम्म्यापेक्षा कमी कर्मचारी असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण नेहमीच जाणवला आहे. मात्र अशावेळी ही संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाची उदासीनता कायम अधोरेखित झाली.
राजकीय हस्तक्षपामुळे अधिकारी देवळा शहरात पदभार घेण्यास करता टाळा टाळ ?
देवळा पोलिस स्टेशनचा कारभार हाती घेण्यासाठी पोलिस निरीक्षक म्हणून येताना कोणी धजावत नाही अशी चर्चा दबक्या आवाजात नेहमीच असते मात्र देवळा शहरात
अधिकाऱ्यांना कसला त्रास आहे हे जाणकार नागरिक देखील समजून आहेत, नेहमी घटना छोटी असली, कोणाची गाडी पकडली तरी राजकीय पुढाऱ्यांचा कॉल येतो. राजकिय हस्तक्षेप जास्त असल्याने अनेक कर्मचारी देवळा शहरात येण्यास धजावत नाही. ही अतिशय गंभीर बाब असून शहरातील राजकिय पुढाऱ्यांनी आपला अनमोल वेळ अशा शुल्लक ठिकाणी घालून शहराची अधिकारी वर्गात बदनामी होणार नाही याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका राजकीय पुढाऱ्यांने पोलिसांशी हुज्जत घालत अरेरावी केल्याची माहिती देखील आहे मात्र पोलिसांना हा राजकीय तोरा कितीदिवस अडचणींचा ठरणार हे महत्वाचे आहे.
कर्मचाऱ्यांची संख्या गेले कित्येक दिवस तोकडीच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सद्याच्या घडीला तब्बल 23 ते 25 कर्मचाऱ्यांची कमतरता असून त्यात अधिकारी वर्गाचा देखील समावेश आहे. हा प्रश्न गेल्या कित्येक दिवस रेंगाळत आहे मात्र ना आमदार पाठपुरावा करतात ना कोणी राजकीय पदाधिकारी लक्ष घालतात. यामुळे दिवसेंदिवस जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कामाचा भार वाढत असून येणारे पोलिस निरिक्षक पत्र व्यवहार करता मात्र वरिष्ठ त्याला फारशी दाद देत नाही हा आजपर्यंतचा इतिहास राहिला आहे. नुकतेच आलेले ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप न्याय देता का याकडे तालुका वसियांचे लक्ष लागून आहे.
५७६ कि.मी.² क्षेत्रफळ असणाऱ्या तालुक्याची लोकसंख्या 2001 च्या आकडेवारीनुसार १,२९,९८८ आहे. या आकडेवारीत आता प्रचंड वाढ झालेली असली तरी सद्या 20 ते 22 कर्मचारी तालुक्याच्या समस्यांचा निवारा करत आहेत. हा भार हलका करण्यासाठी वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. राज्य महामार्गाला लागूनच असलेल्या या तालुक्यात अनेक वेळा समस्या उभ्या राहत असतात अनेक तस्करांच्या देखील मुसक्या आवळल्या आहेत मात्र हे सर्व करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्यास कर्मचाऱ्यांवर येणारा ताण हलका होण्यास मदत होईल.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांची समस्या ही प्रत्येक ठिकाणी आहे. जेवढे कर्मचारी संख्या मंजूर असते त्यापेक्षा थोड्याफार प्रमाणात कमी अधिक होत असते, अनेक ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी द्यावे लागतात. मात्र देवळा तालुक्यांतील कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता येणाऱ्या काही दिवसात नक्कीच कर्मचाऱ्यांची उणीव भरून काढण्यात येईल. सध्याचे कामकाज सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरसाठ हे अतिशय उत्तम हाताळणी करत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी नक्की उभे राहू आणि त्यांना बळ देवू, लवकरच देवळा तालुक्यासाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षकांची जबाबदारी देण्यात येवून नियुक्त केले जाईल.
– शहाजी उमाप , पोलिस अधीक्षक , नाशिक ग्रामीण
देवळा शहरासाठी नवीन कोणी पोलिस निरिक्षक देण्यापेक्षा सद्या काम करत असलेले पुरोषात्तम शिरसाट यांनाच स्वतंत्र कारभार देण्यात यावा अशी मागणी मी पक्षाच्या वतीने करणार आहे. कारण अतिशय निर्भिड पणे त्यांनी कारभार चालवत शहराला शिस्त लावली आहे. असा अधिकारी शहरातील समस्यांना आवर घालण्यासाठी महत्वाचा आहे. तसेच शहरातील पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या ही बाब महत्वाची असून लवकरच वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून महिन्याभरात जास्तीचे कर्मचाऱ्यांची नियुक्ती कशी होईल यासाठी प्रयत्न करू.
– केदा आहेर, ग्रा.जिल्हाध्यक्ष भाजपा
देवळा शहरात काही अनुचित प्रकार घडल्यास सद्य स्थितीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण येत असतो अनेक गावे हे वेगवेगळ्या तालुक्यांच्या सिमांना लागून असल्याने सतर्क असणे आवश्यक आहे. अपघात अथवा काही घटना घडल्यास पोलिसांना पोहचण्यास काहीवेळा विलंब होतो. गस्त घालण्यासाठी देखील विलंब चिंताजनक आहे. निवडणुकांच्या दरम्यान कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यांवर तणाव दिसत होता. त्यांचे आरोग्य देखील महत्वाचे असून वरिष्ठांनी लक्ष घालून कर्मचाऱ्यांची पूर्तता करावी जेणेकरून कायदा सुव्यवस्था येणाऱ्या काळात अबाधित राहील.
– योगेश आहेर, प्रांतिक सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
देवळा शहर विस्तारलेले असल्याने तसेच काही ठिकाणी अवैध धंदे अधुन मधून उघडकीस येत असतात हे कायम स्वरुपी बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचं आहे. पोलिसांच्या आरोग्याचा विचार वरिष्ठांनी करावा. अनेक वेळा सलग ड्युटी करावी लागल्याने कर्मचाऱ्यांवर मानसिक आघात होत असतात, शहरातील पुढाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करत त्यांना मोकळ्या हाताने काम करू द्यावे. प्रत्येक बाबीत हस्तक्षेप टाळावा जेणेकरून त्यांना प्रेशरखाली काम करावे लागणार नाही. पोलीस निरीक्षक नव्या दमाचे द्यावेत गेले कित्येक अधिकारी हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर देवळा शहरात येतात त्यामुळे त्यांच्या कामात उत्साह दिसत नाही.
– उदयकुमार आहेर, प्रदेशाध्यक्ष, शिवसंग्राम संघटना
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम