देवळा : देवळा पोलिसांनी बुधवारी (२) रोजी लोहोणेर परिसरात असलेले अवैध गावठी दारू बनविण्याचे अड्डे उध्वस्त केले. या कारवाईने गावठी दारू बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून एकच खळबळ उडाली आहे.
देवळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू सर्रास उघड्यावर विक्री केली जात असून, यामुळे गावागावात दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा प्रकार वाढला आहे. गावठी दारू बरोबरच महामार्गावरील ढाबे ,हॉटेलात देखील अवैध रित्या सर्व प्रकारची दारूची विक्री होत आहे . याकडे पोलिस खाते दुर्लक्ष करीत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ , पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांच्या पथकाने तालुक्यातील लोहोणेर परिसरातील गिरणा नदीकिनारी असलेले अवैध गावठी दारूचे अड्डडे उध्वस्त केली.
या धडक कारवाईने विक्रेत्यांवर वचक बसला असून ,एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण तालुक्यात सुरु असलेला हा अवैध व्यवसाय बंद करण्यात यावा , अशी मागणी करण्यात आली आहे .
कारवाईत सातत्य हवे….!
देवळा पोलिसांनी आज केलेली कारवाई फक्त सोपस्कार ठरायला नको, प्रत्येकवेळी अधिकारी बदलला की नव्याचे नऊ दिवस म्हणून कारवाई होते मात्र. आता सुरू झालेली कारवाई कायम स्वरुपी राहणार का याकडे तालुका वासियांचे लक्ष लागून आहे. तालुक्यातील हनुमंतपाडा, वार्शी, शेरी या भागातून गावठी दारू वेगवेगळ्या शहरात अगदी नाशिक पर्यंत जात असल्याची चर्चा आहे. मात्र पोलिस विभागातील काही भेदी अवैध धंदे चालकांना माहिती पुरवत असल्याने अधिकाऱ्यांच्या कारवाईला घरातूनच सुरुंग लागत असल्याची देखील चर्चा आहे. मात्र या सर्वसामान्यांच्या चर्चेवर विश्वास ठेवावा की नाही हे पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ठरवणे गरजेचं आहे. समजा आपल्याच प्रशासनात असे भेदी असतील गोपनीयता भंग करत असतील तर यावर कारवाई होणे देखील गरज आहे.
देवळा पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत, चालू देणार नाही. अवैध धंद्याबाबत माहिती करिता नागरीकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. पोलीस हे जनतेचे रक्षक असून समाजातील वाईट प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करणे हाच मानस आहे.
– सहायक पोलिस निरीक्षक, पुरुषोत्तम शिरसाठ ,देवळा पोलिस स्टेशन
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम