Deola | भावड घाट ते रामेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु; मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मोबदला नाही

0
65
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा तालुक्यातील भावडघाट ते रामेश्वर या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट असलेल्या कामाला शनिवारी (दि.२७) रोजी सकाळी ११ वाजता पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. सदरचे काम हे गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी भूसंपादन विभागाकडून मोजणी तसेच योग्य मोबदला मिळत नसल्याने बंद पाडले होते. यामुळे एकरी मार्गावरून जाताना बाजूला तीन फुटाची खटकी असल्याने पावसाळ्यात मोठा अपघात होऊन अनर्थ होण्याची शक्यता लक्षात घेऊन देवळा शहरातील नागरिकांनी (दि.2) जुलै रोजी देवळा तहसीलदारांना पन्नासहुन अधिक सह्यांचे निवेदन देऊन सदर रस्त्याच्या कामास त्वरित सुरुवात करावी, अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता.

सहा महिने लोटले तरी अधिकाऱ्यांकडून स्पष्टता नाही 

यानंतर आज काम सुरु झाल्यानंतर सायंकाळी जमिनीचा मोबदला न मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी एक बैठक घेऊन याबाबत आपली नाराजी उघड केली. या बैठकीला पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते. या रस्त्याच्या कामात भावड घाट ते रामेश्वर फाटा या आठ किमीच्या सिमेंट काँक्रीटचा एकरी मार्ग तयार झाला असून, त्यावर वाहतूक सुरू आहे. परंतु दुहेरी मार्गाचे काम शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा मोबदला मिळेल, की नाही याबाबत साशंकता व्यक्त करून बंद पाडले त्यास सहा महिन्याहुन अधिक काळ लोटला असून, जिल्हाधिकारी ते तहसीलदारांपासून अनेक बैठका पार पडल्या मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी नेमकी कोणाची जमीन संपादित होणार आहे. या बाबतचा खुलासा अद्यापही न केल्यामुळे सदरचे काम स्थगित राहिले.

Deola | देवळा भूमी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या लिलावाचा शुभारंभ

Deola | लोकप्रतिनिधी गप्प का..?

याबाबत लोकप्रतिनिधी गप्प का..? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. मात्र जनतेचा रेटा लक्षात घेता जिल्हा नेते केदा आहेर यांनी संबंधित शेतकरी व अधिकारी यांच्यात समन्वय घडवून आणला. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांनी आपआपल्या गटांची मोजणी करून घेणे पसंत केले व यासाठी काही शेतकऱ्यांनी मोजणी करण्यासाठी पैसेदेखील भरले आहेत. त्यात जे गट भूसंपादित होतील. त्यांना मोबदला देण्याचे ठोस आश्वासन राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांकडून केदा आहेर यांच्या मध्यस्थीने देण्यात आले होते.

मात्र मोजणीसाठी पैसे भरल्यावरदेखील अद्याप मोजणी झाली नसल्याने व संबंधित ठेकेदाराने पोलीस बंदोबस्तात काम सुरु केल्याने या शेतकऱ्यांनी आजचच्या बैठकीत आपली नाराजी बोलून दाखवली. रस्त्याच्या कामाला आमचा विरोध नसून, यात आमच्या जमिनी जात अआहेत. त्यामुळे मोजणी करून आम्हाला आमचा मोबदला द्यावा, अशी मागणी जमीन संपादित होणाऱ्या आपग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Deola | देवळ्यातील अजब चोरीची चर्चा; रात्री चोरी अन् पहाटे चोराने आधारकार्ड, पासबुक परत केले

दरम्यान, या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांसमवेत बुधवार दि.3 जुलै रोजी देवळा येथे भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. यात समन्वय तोडगा म्हणून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता महामार्गालगतच्या शेतकऱ्यांनी मोबदला काय मिळेल..? याविषयी विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी स्वस्वखर्चाने आपल्या जमिनीची मोजणी करून घेण्याचा निर्णय घेतला.

त्यात ज्यांच्या जमिनी जातील. त्यांना मोबदला देण्याचे ठोस आश्वासन राष्ट्रीय महामार्ग चे कार्यकारी अभियंता उदय पालवे यांनी दिले होते. मात्र रस्त्याची मोजणी न करता शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात रस्त्याच्या कामाला करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमवस्था निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

भावडे ते गुंजाळनगर पर्यंतच्या या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात जवळपास १६५ शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्याने या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या अधिग्रहणाबाबत साशंकता आहे. याबाबत महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता किती रुंदीचा आहे. याची माहिती द्यावी व मोजणीनुसार भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा.

– विजय मोरे (शेतकरी, भावडे)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here